वर्धा : मायमराठीच्या सन्मानाकरिता यावर्षी वर्ध्यात प्रथमच दोन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकाचवेळी होऊ घातले आहेत. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समावेश आहे. दोन्ही साहित्य संमेलनाच्या तारखा एकच असून, दोघांचेही विचार आणि तत्त्वज्ञान यामध्ये भिन्नता आहे. त्यामुळे वर्ध्याच्या शांती-अहिंसेच्या भूमीवर तीन दिवस सारस्वतांची वैचारिक दंगल रंगणार असून, साहित्यप्रेमींना ती अनुभवता येणार आहे.
साहित्यातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत. साहित्यामध्ये समाजातील वास्तविकता साकार झाली पाहिजे, ही अपेक्षा वाचकांना असते; परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाचा निधी मिळत असल्याने शासनविरोधी भूमिका या व्यासपीठावरून मांडण्यासाठी बंधने घातली जात असल्यानेच प्रस्थापित विचार, तत्त्वज्ञानाच्या विरोधातील संघर्षासाठी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जन्म झाल्याचे साहित्यिक सांगतात.
तब्बल ५३ वर्षांनंतर दुसऱ्यांदा ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान वर्ध्याला मिळाला असून, जय्यत तयारी सुरू आहे. या संमेलनातील विचार व तत्त्वज्ञानाला विरोध दर्शविणारे १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनही पहिल्यांदाच वर्ध्यात होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीला स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत, तर अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सर्कस मैदानावरील कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरीत ४ व ५ फेब्रुवारीला होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वर्ध्यात ३ ते ५ फेब्रुवारीच्या कालावधीत वैचारिक, तत्त्वज्ञानी आणि विद्रोही साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार आहे.
एकाकडे शासकीय निधी, तर दुसरीकडे झोळी रिकामीच
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळतो, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतरही ठिकाणांहून कोट्यवधींचा निधी मिळत असल्याने या संमेलनाचा खर्च अंदाजे ३ कोटींच्या आसपास असल्याचे आयोजक सांगतात. त्यानुसार जेवणावळीपासून तर राहण्यापर्यंतची उत्तम व्यवस्था केली जात आहे. दुसरीकडे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शासन, प्रशासनाकडून कोणताही निधी तर सोडा सहकार्यही मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या साहित्य संमेलनाचा मानसन्मान व्हावाच, त्याला आमचा विरोध नाही; परंतु साहित्यिकांबाबत शासन, प्रशासनाकडून असा दुजाभाव होत असल्याने विद्रोहींची भूमिका आणखीच तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.
दोन संमेलनातील वेगळेपण काय ?
सभामंडपाचे भूमिपूजन - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन विधिवत कुदळ मारून व भूमातेचे पूजन करून झाले. अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन नांगरणीच्या प्रतीकाद्वारे भूमीचा सन्मान करून झाले.
संमेलनाचे गौरव गीत - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता कवी संजय इंगळे तिगावकर लिखित ‘सकल जनांची, सजग मनांची वरदायिनी वर्धा नगरी, ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी’ हे गौरवगीत तयार केले आहे, तर अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाकरिता सुधीर गिऱ्हे लिखित ‘जोतिबांची सावित्री ही ठरली ज्ञानज्योती, स्त्री शिक्षणाचे द्वार उघडले झाली क्रांतिज्योती...’ असे गौरवगीत साकार झाले आहे.
संमेलनाचे उद्घाटक -
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास व आमदार डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित राहणार आहेत, तर विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका, सिनेअभिनेत्री रसिका आगासे-अय्युब यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्ष लेखक चंद्रकांत वानखेडे, महाकवी व आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर उपस्थित राहणार आहेत.