लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : मार्च महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहेत. त्यामुळे चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाची चाचणी केल्यानंतरही त्याला काही त्रास नसल्यास गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. मात्र, पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्ण शहरात बेजबाबदारपणे कोरोना वाटत फिरत असल्याचे चित्र आर्वी शहरात बघावयास मिळाले. ही परिस्थिती इतरही ठिकाणी असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यासह आर्वी तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. येथे कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, तर लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाने सरळ घरी जाऊन गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. परंतु, बरेच बेजबाबदार नागरिक अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही बाजारात बिनधास्त फिरताना दिसतात. मित्रमंडळींसोबत किंवा निकटवर्तीयांची गप्पा गोष्टी करणे, चहा-पान, नास्ता करणे, तसेच बाजारात जाऊन खरेदी करणे, आदी प्रकार पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीत आणखीच भर पडत आहे. कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर कोरोना होत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. लसीकरण हे केवळ सुरक्षाकवच आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही आवश्यक ती काळजी घेण्याची गरज नाही. जिल्ह्यात लसीकरणानंतरही २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरापर्यंत सोडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने घेण्याची गरज आहे.
तिघांना भेटला अन् कोरोना वाटलाएक युवक दुचाकीने उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर येथून घरी जाताना तो पद्मावती चौकात थांबला. येथे तिघांना भेटला, तर शिवाजी चौकात काही जणांशी चर्चा केली. येथे एक तास घालविल्यानंतर बसस्थानका-वरील चौकशी कक्षात जाऊन चौकशी केली. त्यानंतर घराकडे निघाला.
चहा प्यायला अन् भाजीपालाही घेतलाउपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेला एक व्यक्ती थेट घरी न जाता चौकात थांबून चहा प्यायला. त्यानंतर मास्क लावून सर्वांशी चर्चा केली. जवळच्याच हातगाडीवरील भाजीपाला व फळ विकत घेतले. येथेच कोरोना वाटला.
या बेजबाबदारपणाला आवर घालणार तरी कोण? आर्वी विभागात विलगीकरण केंद्र नाहीत. शासनाने डिसेंबरपासून ते बंद केले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र, कोणाच्या घरी दोन खोल्या आहेत, तर कोणाच्या घरी चार, तर अनेकांच्या घरी वेगळ राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. तरीही पॉझिटिव्ह रुग्णाला घरीच राहण्याचा आग्रह केल्या जातो. तो घरी राहून बरे वाटायला लागला की घराबाहेर कोरोना वाटत फिरतो. वयोवृद्ध आणि ज्येष्ठांना उपचारांकरिता रुग्णालयात दाखल केले जाते; पण इतर रुग्णांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्राची मागणी आहे.विलगीकरणात असूनही अनेकजण शहरात बिनधास्त फिरताना दिसतात. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही शहरात मुक्त वावर राहत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.