‘सुनंदा जिल्हाधिकारी होते’ : वाहितीपूर उच्च प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम, थेट संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणावर्धा : सुनंदा व संजय दोघे वर्गमित्र असतात. सारखेच हुशार असल्याने दोघेही शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम येतात. शिक्षणाकरिता सुनंदाला कुटुंबीयांचे सहकार्य मिळते, तर संजयचे वडील शिक्षण संस्थेत नोकरीवर असल्याने स्वत:च्या जागेवर संजयला चपराशाची नोकरी ते मिळवून देतात. याच दरम्यान सुनंदा ही उच्चशिक्षित होऊन थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारते. जिल्हाधिकाऱ्यांचा गावात सत्कार समारंभ असतो. त्यावेळी संजय आणि सुनंदा पुन्हा एकमेकांना भेटतात. यावेळी संवादात मी चपराशी असल्याचे संजय सांगतो. त्यावेळी सुनंदा त्याला निराश न करता पुढील शिक्षणाची प्रेरणा देते. हा सारांश आहे. इयत्ता सातवीतील सुनंदा जिल्हाधिकारी होते, या पाठाचा. जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास कसा खडतड असतो. पण प्रयत्न केल्याने ते शिखर कशारितीने गाठू शकता. याचे थेट प्रात्यक्षिक सेलू तालुक्यातील वाहितपूर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील सातवीच्या २३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधूनच घेतले. शिक्षक वर्गात पाठ शिकवून प्रत्यक्ष चित्र विद्यार्थ्यांपुढे उभे करतात. पण जिल्हाधिकाऱ्यांसोबतच हा पाठ जर आत्मसात करायला मिळाला तर विद्यार्थ्यांना जास्त आनंद होईल ही बाब ध्यानात घेत वाहितपूर येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक देवेंद्र गाठे यांनी याबाबतची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. ठरल्याप्रमाणे सोमवारी अगदी शाळेच्या वेळेवर सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे थांबले. वर्गाप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित केली. त्यावेळी शिक्षक मात्र गाठे नव्हते तर होते, खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल. जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर प्रथम पाठ आईवडीलांच्या सेवेचा झाला. तेथूनच विद्यार्थ्यांचा एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार जिल्हाधिकाऱ्यांवर होत राहीला. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले. या पाठात सुमारे ४८ प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून समाधान मिळवून घेतले. तब्बल ९० मिनिटे हा जिल्हाधिकारी-विद्यार्थी संवाद चालला. आज पालकांच्या इच्छेमुळे विद्यार्थ्यांवर केवळ डॉक्टर व इंजिनिअर होण्याची सक्ती केली जाते. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परिक्षेचा दृष्टीकोन ठेवा. दररोज अभ्यास करा आणि प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय गाठा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी नवाल यांनी विद्यार्थ्यांना केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अध्ययन करावे, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्राने सन्मानित केले. मुख्याध्यापक देवेंद्र गाठे, केंद्रप्रमुख चंदा डायगव्हाणे, शिक्षक रवींद्र कडू, डॉ. किरण धांदे, पालक निलेश दांडेकर, भगवान महाकाळकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम साध्य झाला. सामुदायिक प्रार्थनेने वर्गपाठाचा समारोप करण्यात आला. हा पाठ सदैव स्मरणात राहिल असे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.(शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनी गिरविला पाठ
By admin | Published: September 22, 2016 1:17 AM