अविनाश डोळस : ‘भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’वर व्याख्यान हिंगणघाट : देशातील सत्ताधारी जमात बनून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हे आंबेडकरी राजकारणाचे मुख्य प्रयोजन आहे; पण त्यासाठी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे, असे मत प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक प्रबोधन मंचाद्वारे ‘आजच्या भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विषयाच्या अनुषंगाने प्रा. डोळस पूढे म्हणाले की, भारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध विचारप्रवाह आहेत; पण कोणत्याही विचार प्रवाहातून भारतीय संविधानाला अपेक्षित समताधिष्ठित समाजनिर्मितेचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही. उलट विविध घटकांनी राज्यात जातीय नेतृत्व उभे करून जातीवादाला खतपाणी घालून विषमता अधिकच घट्ट केली गेली. जन्माने, वर्णाने श्रेष्ठ तोच राजकारणातील नेता व सत्ताधारी ठरविला गेला. २०१४ नंतर तर हे संविधान आमचे नाहीच, ही सांसदीय शासन पद्धती आमच्यावर लादण्यात आली, असे वेळोवेळी दाखवून देऊन देव, धर्म, वैदिक परंपरा मान्य करणारा वर्ग सत्तेवर आला. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जन्माने श्रेष्ठ असलेला अध्यक्ष निवडून आणता येऊ शकतो व संपूर्ण राजकारणावर आपली पकड घट्ट करता येते, म्हणून समर्थन केले जात आहे. अशावेळी आंबेडकरी माणसाने प्रतिक्रियाच देत बसण्यापेक्षा कृती व क्रिया करून भारतीय राजकारणाला प्रभावित करून इतरांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडावे. विशेषत: समताधिष्ठित समाज निर्मिती करण्यासाठी आंबेडकरी सुशिक्षित वर्गाने नेतृत्व करावे आणि हेच धम्माचे प्रयोजन आहे, असेही डॉ. डोळस यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. अशोक बुरबुरे होते. त्यांनी आंबेडकरी समाजातील अंतर्विरोध स्पष्ट करून डॉ. आंबेडकरानी संविधानाच्या माध्यमातून नवभारताची निर्मिती व्हावी, डोके मोजण्यापेक्षा गुणवत्ता प्राप्त लोकांच्या हाती सत्ता असावी व संविधान संस्कृती निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. तक्षशील सुटे यांनी प्रजासत्ताक प्रबोधन मंच आणि व्याख्यानाच्या विषयाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमेश वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सेवकदास खेळकर, हरीभाऊ भानसे, उद्धव धाबर्डे, बुद्धमजी कांबळे, गौतम बुरबुरे, डॉ वाघमारे, प्रा गुजरकर, प्रा. वानखेडे, नामदेव वासेकर, प्रा हेमंत झाडे, सचिन कवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी राजकारण
By admin | Published: February 04, 2017 12:54 AM