मोहगाव येथील प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कगिरड : मोहगाव ग्रा.पं. च्या स्वच्छता व पाणी पुरवठा समितीच्या बँक खात्यातील रक्कम धनादेशावर अध्यक्षाची खोटी सही करून सचिव व सदस्यांनी संगममताने काढले. या रकमेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करीत समितीच्या अध्यक्ष सविता शेळके यांनी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मोहगाव ग्रा.पं. अंतर्गत पाच गावांचा समावेश आहे. यात मोहगाव, वानरचुआ, तावी, रासा, केसलापार या गावांचा समावेश आहे. स्थानिक पाणी पुरवठा देखभाल, दुरूस्ती, व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जुनी समिती विसर्जित करून ग्रामसभेतून नवीन समिती स्थापित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सविता शेळके व सचिवपदी दुधकोहळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामसभेतून विसर्जित केलेल्या समितीच्या बँक खात्यात २ लाख ७५ हजार ६०९ रुपये होते. ही रक्कम नव्या समितीकडे हस्तांतरित करण्यात आली. या रकमेतून नळयोजना दुरूस्ती, देखभाल ही कामे करायची होती; पण अध्यक्षाच्या परवानगीविनाच सचिवाने १ लाख ११ हजार ६६३ रुपये निधी विविध नावाच्या धनादेशाद्वारे लंपास केल्याचा आरोप अध्यक्षांनी तक्रारीतून केला आहे. गिरड येथील भारतीय स्टेट बँकेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे खाते क्र. ३१६८८०२५०३५ आहे. या खात्यातून सुलभ व्यवहारासाठी चेकबुक सुविधा देण्यात आली होती. बँकेतील पैशाची उचल करण्याकरिता अध्यक्ष व सचिवांच्या सह्यांसह व्यवहाराचे अधिकार समितीने दिले होते. या समितीच्या अध्यक्ष सविता शेळके यांच्या मते, १ जानेवारी २०१७ पासून घरगुती भांडणामुळे त्या माहेरी राहतात. परिणामी, सहा महिन्यांपासून कुठल्याही धनादेशावर व कागदपत्रांवर त्यांनी सह्या केल्या नाही; पण जानेवारी ते जून २०१७ पर्यंत समितीच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ११ हजार ६६३ रुपये विविध नावाने धनादेशाच्या माध्यमातून उचल केल्याचे निदर्शनास आले. यावरून गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध होत असून या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अध्यक्ष शेळके यांनी तक्रारी केल्या आहेत.
पाणी पुरवठ्याच्या खात्यातील रकमेचा गैरव्यवहार
By admin | Published: July 14, 2017 1:35 AM