हिंगणघाट (वर्धा): येथील भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल नागरिकांच्या असलेल्या तक्रारीवरुन सोमवारपासून चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. आज भूमीअभिलेख उपसंचालक नागपुरची चमू व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असतानाच येथील नझुल भूमापकाने बसस्थानक जवळ आॅलआऊट मॉस्किटो विषारी द्रव्य प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी ४ वाजतादरम्यान घडली असून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रशांत बबनराव येते (५२) असे भूमापकाचे नाव आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात आमदार समीर कुणावर यांनी आकस्मिक भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यात कार्यालयीन दफ्तर दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारावरुन आमदारांनी थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून कार्यालयातील प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. याचीच दखल घेत भूमी अभिलेख उपसंचालक शिंदे यांनी तीन कर्मचाºयांना या कार्यालयात पाठवून प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.
भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयातील उपअधीक्षक सतीश पवार तसेच वरिष्ठ लिपिक मनिष जांगळे व मृणाल द्र्रवेकार हे दोन दिवस येथे थांबून नागरिकांचे समस्या जाणून घेणार असून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणार आहे. तसेच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले या सुद्धा या कार्यालयातील गैरप्रकराची चौकशीकरुन सात दिवसात शासनाकडे अहवाल पाठविणार आहे. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याच दरम्यान येथील भूमापक येते यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने खळबळ उडाली. त्यांना प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयात तर नंतर सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांनी जाणल्या समस्याभूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांबद्दल नागरिकांच्या गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या. येथे मोठ्या प्रमाणावर दलालामार्फत कामे होत असून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याची दखल घेऊनच आमदार समीर कुणावार यांनी भूमी अभिलेख कार्यालय गाठले होते. तेव्हा त्यांनी अनेक गैरप्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी सुत्रे हलविली. आज ते उपअधीक्षक सुनील बन यांच्या चौकशी चमूसह कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी उपस्थितांच्या व्यथा जाणून घेतल्या. या कार्यालयाकरिता येत्या १५ दिवसात पूर्णवेळ उपअधीक्षक दिला जाईल तसेच चौकषी समितीच्या अहवालावरुन दोषीवर कारवाई होणार, असा विश्वास आमदार समीर कुणावार यांनी बोलून दाखविला.