प्रकाश एदलाबादकर : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालादेवळी : कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे. सासू सुनेशी व वडील मुलाशी धड बोलत नसल्याचे विदारक चित्र आहे. लहान वाटणारा माणूस मोठा व मोठा दिसणारा व्यक्ती लहान व शुद्र असल्याची अनुभूती येत आहे. यामुळे स्वत:ची ओळख पटविण्यासोबतच मनातील अहंकार बाजूला सारण्यातच खरा आनंद आहे, असे मत विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रकाश एदलाबादकर यांनी व्यक्त केले.देव कुणीही बघितला नाही. याचा अर्थ देव अस्तित्वात नाही, असा होत नाही, हे सांगताना एदलाबादकर म्हणाले की, असे असले तरी फुले, अगरबत्ती, दुर्वा या सर्व देवासमोरील उपकरणांना महत्त्व देण्यापेक्षा समाजातील माणसे जपण्यासाठी वेळ घालवा. संकटातून मार्ग काढण्यात परमार्थ शोधा. आयुष्यात आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला अर्पण करतो वा एखाद्यासाठी धडपडतो, म्हणजेच दुसऱ्यासाठी जगण्याचा तो खरा आनंद असतो. ऋषी, मूनींनी माणसाची सेवा हिच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले, असेही एदलाबादकर यांनी विषयाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. अग्रवाल धर्मशाळेत साबाजी स्पोर्टस असोसिएशनद्वारे श्यामसुंदर अग्रवाल स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली. यावेळी ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अध्यक्ष शोभा तडस तर अतिथी म्हणून यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व श्यामसुंदर अग्रवाल यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणप्राप्त विद्यार्र्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात दहावीची वैष्णवी सुरेश गावंडे, बारावीच्या प्रतिभा विनोद जगताप व पौर्णिमा राजू हिंगे यांचा समावेश होता. तडस यांनी श्यामसुंदर अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून साबाजी स्पोर्टस असो. चे अध्यक्ष मोहनलाल अग्रवाल यांनी ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय माजी प्राचार्य दयानंद कात्रे यांनी करून दिला. संचालन नगरसेवक राहुल चोपडा यांनी केले तर आभार नरेश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला ईमरान राही, दाऊदास टावरी, शरद नाईक, मधू अग्रवाल, प्रकाश कांकरीया, सुरजमल जैन, शरद आदमने, महेश अग्रवाल, श्यामसुंदर बासू, विजय मांडवकर, ग्रामसेवक होले, मनोज येवतकर, अच्युत इंगोले व नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कुटुंबातील संवाद संपुष्टात येत असल्याने आनंद नष्ट होतोय
By admin | Published: September 26, 2016 2:21 AM