चैतन्य जोशी
वर्धा : शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी, तसेच बापूंचे विचार समजावून सांगण्यासाठी महात्मा गांधींच्या निसर्गरम्य व ऐतिहासिक सेवाग्राम येथील गांधीजींच्या आश्रम परिसरात ७ ते ९ जूनपर्यंत ‘आनंदशाळा’ निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जमनालाल बजाज स्मृती ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील १२ ते १७ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी सेवाग्राम प्रतिष्ठानकडून असा नावीन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे, हे विशेष.
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमचे महत्त्व, त्याची उद्दिष्टे व कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी एक ग्रंथालय, संशोधन केंद्र आणि संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. गांधीजींचा वारसा योग्य प्रकारे जतन करून मानवतेला समर्पित करणे, हा यामागचा उद्देश आहे. याच उद्दिष्टपूर्तीसाठी जमनालाल बजाज स्मृती ग्रंथालय व संशोधन केंद्र समर्पित आहे. राज्य शासनानेही याचे महत्त्व समजून घेत, याला पाठिंबा दिला आहे.
आश्रम प्रतिष्ठानने एप्रिल, २०२१ पासून या कार्याची सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वर्तमान परिस्थितीत सत्य, अहिंसा, प्रेम आदी मानवी मूल्ये यांची गरज समजावून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात विविध विषयांवर व्याखाने, चर्चा, खेळ, मनोरंजन, स्थळभेट, चित्रफीत आदींचे आयोजन असल्याची माहिती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या सचिव चतुरा रासकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा
जि.प. शाळेतील एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन विद्यार्थ्यांची निवड शिबिरासाठी करायची आहे. सहभागींची संख्या ५० पर्यंत मर्यादित असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ३१ मेपर्यंत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या ईमेलवर किंवा स्पीडपोस्टद्वारे अर्ज पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनीही दिल्या शाळांना सूचना
शिबिरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास सांगावे, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या शाळांतील मुख्याध्यापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
निवास व भोजनाची व्यवस्था
शिबिरात होणारे कार्यक्रम हे मराठीत असतील. दुसरी कार्यशाळा हिंदी भाषेत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सेवाग्राम आश्रमच्या यात्री निवासात करण्यात येणार आहे.