३४ अंगणवाडी वस्तु शिकस्त : ८७ बालके तीव्र कुपोषण श्रेणीत अरुण फाळके कारंजा(घा.)० ते ६ वयोगटातील बालकांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ करण्यासाठी शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना या नावाखाली वर्धा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात अंगणवाडी प्रकल्प सुरू केलेले आहेत. १९८५ ला सुरू करण्यात आलेला हा सर्वांत जुना आणि पहिला प्रकल्प आहे. येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी तालुक्यात बालविकासाचे विविध कार्यक्रम राबवून शासन दरबारी कारंजाच्या प्रकल्पाला लौकीक प्राप्त करून दिला. पण दोन वर्षांपासून शासन दरबारी हा महत्त्वाचा प्रकल्प दुर्लक्षित आहे. दोन वर्षांपासून या प्रकल्पाला नियमित प्रकल्प अधिकारी नाही. पर्यवेक्षिका महाडीक प्रकल्पाचा कारभार प्र्रभारी म्हणून सांभाळीत असल्याने अनेक शासन योजनांपासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.प्रकल्पाचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत अपूऱ्या जागेत भरत आहे. दोन पर्यवेक्षकांची जागा रिक्त आहे. येथे विस्तार अधिकाऱ्यांची जागा नुकतीच भरली आहे. या शिवाय तीन मदतनीसाचंीही जागा रिक्त आहे. पालकांमध्ये इंग्रजी कॉन्व्हेंटचे फॅड वाढल्यामुळे अंगणवाडीतील मुलांची संख्या एकदम रोडावली असल्याचे चित्र आहे. असे असले तरी शहरापेक्षा ग्रामीण भागात बालकांची उपस्थिती बरी आहे.कारंजा तालुक्यात १४१ मोठ्या व आठ मिनी अश्या एकूण १४९ अंगणवाड्या आहेत. १४९ अंगणवाड्यासाठी, १४९ अंगणवाडी सेविका कार्यरत असून तीन मदतनीसांच्या जागा रिक्त आहेत. गवंडी, पारडी व धामकुंड येथील मदतनीसांच्या तीन जागा आचार संहितेनंतर नियमानुसार भरल्या जातील अशी माहिती प्रभारी प्रकल्पाधिकारी महाडीक यांनी दिली.
अंगणवाडी प्रकल्प दोन वर्षांपासून अधिकाऱ्याविना
By admin | Published: January 13, 2017 1:14 AM