जिल्हाकचेरीसमोर मुक्काम आंदोलन वर्धा : अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने अनेक आश्वासने दिली. ही सर्वच आश्वासने हवेत विरली. यामुळे आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आक्रोष आंदोलन सुरू केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री तसेच पालकमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. शासनाने तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात घेता त्यांच्या मानधनात वाढ करावी. महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानधन देण्यात यावे. तसेच मानधनात प्रतीवर्षी ५ टक्के वाढ करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक महिन्याची पगारी उन्हाळी सुटी देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनात नमुद केलेल्या मागण्यांवर ३० मार्चपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास १ एप्रिल २०१७ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला.जिल्हाकचेरीसमोरील आक्रोष आंदोलनाचे नेतृत्त्व आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक अस्लम पठाण यांनी केले. आंदोलनात विजया पावडे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, सुनंदा आखाडे, शोभा सायंकार, रेखा काचोळे, शोभा तिवारी, नलीनी चौधरी, बबीता चिमोटे, विमल कौरती, रंजना तांभेकर, वंदना खोब्रागडे, सुनीता टिपले, माला भगत, हिरा बावते, सीमा गढिया, वंदना बाचले, प्रज्ञा ढोले यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी) थाळी वाजवून नोंदविला निषेधअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या या मुक्कामी आक्रोष आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या महिलांनी थाळी वाजवून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे दिलेले आश्वासन शासनाने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले.
अंगणवाडी सेविका आक्रमक
By admin | Published: March 21, 2017 1:11 AM