जि.प. प्रशासनाला साकडे : शासनाची प्रतिकात्मक पे्रतयात्रावर्धा : शासनाच्यावतीने अंगणवाडी व आशा सेविकांना भरीव वेतन वाढ देण्याची घोषणा केली होती. त्याला वर्षाचा कालावधी झाला. शिवाय नव्या आर्थिक बजेटमध्ये तशी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. या निषेधात आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. यात शासनाचा विरोध नोंदविण्याकरिता प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली. शिवाय कन्हैया प्रकरणाचाही येथे निषेध नोंदविण्यात आला. सोबतच आशा सेविकांच्या समस्याही मांडण्यात आल्या. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. अर्ध्या रस्त्यातून पोलिसांनी मोर्चातील अंत्ययात्रा मोडलीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आयटकच्यावतीने शासनाचा निषेध नोंदविण्याकरिता शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. यामुळे रस्त्याने चर्चा वाढत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर मोर्चा पोहोचताच त्यातील प्रतिकात्मक अंत्ययात्रा पोलिसांनी मोडून काढली. यामुळे आंदोलकांत काही काळ संताप निर्माण झाला होता. मात्र महिलांनी पोलिसांना सहकार्य करीत त्यांचा मोर्चा पुढे नेला. यामुळे मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही.