लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिनिंग फॅक्टरीत कापूस टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून देवळी व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारी सायंकाळपर्यंत कापसाच्या लिलावाअभावी वेठीस धरण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप तसेच चक्रीवादळाचा संभावीत धोका लक्षात घेवून या संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी वर्धा-यवतमाळ महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन केले.भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी कास्तकारांची बाजू घेवून बैठा सत्याग्रहात सहभाग घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील नियोजनाचा अभाव तसेच जिनिंग मालकांच्या दुर्लक्षीत प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. अखेर सायंकाळी बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे, तहसीलदार राजेश सरवदे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, संचालक अयुब अली पटेल व अमोल कसनारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर कापसाच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. पावसाळा जवळ येवूनही कापसाच्या खरेदीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सीसीआयची खरेदी असलेल्या जिनिंग मालकांची बैठक बोलावून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार येत्या काही दिवसात फक्त एक हजार कापूस गाड्यांची खरेदी व जिनिंग करण्याची अट टाकून भूमिका घेण्यात आली. त्यानुसार सीसीआयची खरेदी असलेल्या चार जिनिंगमध्ये २०० ते २५० कापूस गाड्या घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण, या निर्णयाचा दोन दिवसातच फुगा फुटून कापूस उत्पादकांना लिलावाअभावी दिवसभर वेठीस धरण्यात आले. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाड्या बाजार समितीच्या नियमानुसार मार्केट यार्डमध्ये आणल्या होत्या. सीसीआयचे ग्रेडर रमेश बोरवले यांची कापूस गाड्या घेण्यास कोणतीही अडचण नसताना जिनिंग मालकांकडून यामध्ये खोडा टाकण्यात आला. या जिनिंगमालकांची प्रशासनाच्यावतीने दिवसभर मनधरणी करूनही त्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने या जिनिंगमालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली. बाजार समिती व जिनिंगमालक यांच्यातील निर्णयानुसार एक हजार कापूस गाड्या घेतल्यानंतर मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या उर्वरित कापूस गाड्यांचे काय? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. सीसीआयच्या कापूस खरेदीची भिस्त जिनिंग कामगारावर अवलंबून असल्याचे चित्र रंगविले जात आहे. एक हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्यानंतर संबंधीत जिनिंग कामगार आपल्या गृह राज्यात जाणार असल्याचे जिनिंग मालकांनी सांगितले. मान्सूनपूर्व पाऊस लक्षात घेता या केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.
जिनिंग मालकासोबतच्या निर्णयानुसार एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्यानंतरही काही जिनिंगमध्ये ही खरेदी सुरू राहणार आहे. पावसाचा अंदाज घेवून टप्प्याटप्प्याने ही खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- मनोहर खडसे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.