देवळी : तालुक्यातील इंझाळा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तानबा उईके व भारतीय जनता पक्षाचे किशोर मडावी यांच्या दरम्यान काट्याची लढत होत आहे. अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य विष्णू ताडाम यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. यातील विजयी उमेदवार जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाकरिता महत्त्वाचा ठरणार असल्याने याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. वर्धा जिल्हा परिषदेत काँग्रेस व भाजपाच्या संख्याबळाची स्थिती सारखीच असल्यामुळे आगामी जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी ही जागा महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे परस्परविरोधी दोन्ही पक्षांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्त्यारोप करून प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाच्यावतीने खा. रामदास तडस, अरूण अडसड, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, राजेश बकाणे व पदाधिकाऱ्यांनी जाहीर सभांचे आयोजन व यंत्रणा राबवून रणकंदन माजविले आहे. तर काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, पंचायत समिती सभावती सभापती दिनेश धांदे, मनोज वसू व इतरांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी तसेच जिल्ह्यातील दिग्गजांची उपस्थिती व मोटार गाड्यांच्या वर्दळीमुळे ही निवडणूक चांगलीच गाजत आहे. असे असताना विभागाचे आमदार रणजीत कांबळे यांचे अद्यापपर्यंत या मतदार संघात दर्शन झाले नाही. यामुळे मतदारात विविध चर्चा सुरू आहे. याच कारणाने कार्यकर्त्यांसोबतच मतदार बुचकळ्यात पडला आहे. या मतदार संघात ११ हजार ६७७ मतदार असून यामध्ये पुरूष सहा हजार २३० व पाच हजार ४४७ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राहणार आहे. निवडणुकीचा निकाल स्थानिक नगरभवन येथे ३० जूनला जाहीर होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर व तहसीलदार जितेंद्र कुवर काम पाहत आहे. (प्रतिनिधी)
इंझाळा जि.प. गटात भाजपा व काँग्रेसमध्ये काट्याची लढत
By admin | Published: June 28, 2014 11:43 PM