चैतन्य जोशी
वर्धा : सुसाट कारच्या स्टेअरिंगवरुन चालकाने नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत कार थेट पुलाखालून रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर चालक व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. हा अपघात ११ जून रोजी येळाकेळी येथून समोर गेलेल्या समृद्धी महामार्गावर पुलगाव नजीक झाला. या अपघाताची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली. प्रियरंजनकुमार गोहित (३७) आणि सोनी प्रियरंजन गोहीत (३५) अशी मृतकांची नावे आहे. तर जखमींमध्ये चालक पेंदुकर इंद्रकुमार बैद आणि सान्वी गोहीत (८) व यीक्षीत गोहीत (४) यांचा समावेश असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रियरंजनकुमार गोहित हे मुळचे मधुबिना जिल्हा बिहार येथील रहिवासी आहेत. मात्र, ते पुणे येथे नोकरीवर होते. ते नागपूर येथून एम.एच. १२ युजे. ६९७१ क्रमांकाच्या कारने मुंबईकडे जात होते. चालक पेंदुकर बैद याला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.