राजेश साेलंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘रॅन्चाे’ असा उल्लेख केला तरी आपल्या डाेळ्यासमाेर ‘थ्री इडियट्स’मधला फुंगसुक वांगडू आठवताे. आपल्या कल्पक बुद्धीने जुगाड तंत्र तयार करण्यात ताे तरबेज... असे अनेक तरुण आता पुढे येत आहे. असाच हेलिकॉप्टर बनवणारा विदर्भातील एक जुगाडू ‘रॅन्चाे’ गेल्या काही दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. त्या घटनेची शाई वाळते न वाळते ताेच आणखी एक विदर्भातीच रॅन्चाे काळाने हिरावून घेतला. हा रॅन्चाे कृषि आणि गावविकासासाठी झपाटलेला हाेता, हे विशेष! (Another 'rancho' struggling for agricultural development is behind the scenes)
अभिजित प्रशांत वंजारी (२०) रा. मांडवा, ता. आर्वी, जि. वर्धा असे या जुगाडू रॅन्चाेचे नाव. पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षाला पिंपरी मेघे कॉलेजमध्ये ताे शिकत हाेता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजितला परिस्थितीची जाणीव हाेती आणि शेतकऱ्यांचे हाेणारे हाल हे त्याला पाहवत नव्हते. त्यातूनच ताे शेतीत राबायच आणि शेतकऱ्यांसाठी विविध प्रयाेग करून छाेट्या - छाेट्या तुकड्यांमधून यंत्र तयार करीत हाेता. यासाठी त्याने तंत्रनिकेतनमध्येही धडे गिरवले. अलीकडेच त्याने तुरीचे पीक बहरावे, त्या तुरीला आणखी फांद्या फुटून फुलं आणि त्यानंतर अर्थातच उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी तुरीचे शेंडे (वरील भाग) कापण्यासाठी यंत्र तयार केले. बाजारात असलेले अशाचप्रकारे यंत्र कितीतरी महाग असल्याने शेतकरी ते यंत्र घेण्यापासून वंचित राहात. ही बाब ओळखून त्याने शेतीसाठी तसेच पण छाेटेसे यंत्र तयार केले.
गावातील अनेक गरीब गरजू शेतकऱ्यांना अत्यल्प दरात त्याने ते विकले. परंतु त्याच यंत्राने त्याचा घात केला. गुरुवारी ताे त्याच यंत्राने शेतात तुरीची खुडणी करीत हाेता. परंतु नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले हाेते. त्याच यंत्राचे नटबाेल्ट तुटले आणि त्या मशीनचे ब्लेड थेट त्याच्या पाेटात खुपसले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शुक्रवारी त्याच्या गावात शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलसावंगी (जि. यवतमाळ) येथील हेलिकाॅप्टर ऊर्फ इस्माईल शेख या उमद्या तरुणाच्या अकाली एक्झिटनंतर मनाला चटका लावणारी ही घटना आहे. विदर्भाने अवघ्या एका महिन्यात दाेन कल्पक अशा रॅन्चाेला गमावले.
असे हाेते त्याचे वेगवेगळे प्रयाेग
कुलरच्या मदतीने मदतीने त्याने स्प्रिंकलर तयार केले होते. त्यासाेबतच शेतातील साहित्य डोक्यावरून घरी आणताना शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहून त्याने दुचाकीवर ट्रॉली तयार केली होती. स्वयंपाक घरात भाजी फोडणी घालताना किंवा गॅसमुळे तयार होणारी गरम हवा बाहेर निघून जावी; आईला त्रास होऊ नये यासाठी त्याने स्वयंपाकघरात गॅसवरील चिमणी तयार केली होती. ती अद्यापही त्याच्या घरी आहे. त्यामध्येही त्या माॅडिफिकेशन करावयाचे हाेते.
स्कूटरवरची ट्रॅक्टरची छोटी ट्रॉली तयार केली होती. इलेक्ट्रिक फिटिंग असो की कोणतीही फिटिंग असो की स्प्रिंकलर फिटिंग असो इतर प्रकारची; सर्व प्रकाराची फिटिंग ताे स्वत:च करायचा. शेतात वेगवेगळे प्रयोग करायचा. इस्रायल पद्धतीने शेती करण्याचा त्याचा ध्यास होता. गुरुदेव सेवा मंडळात तो नेहमी कार्यरत असायचा. तुकडोजी महाराजांची समाधी मोझरीला जशी आहे तशी समाधीची हुबेहूब प्रतिकृती त्याने गावात तयार केली हाेती. त्यातही त्याची तळमळ यासाठी की गावातील नागरिकांना दूरवर जाताना हाेणारा त्रास कमी व्हावा.
घरचा विद्युतपुरवठा खंडित झाला तर कुठलेही बटन न दाबता आपोआप लाईट लागेल असे नवीन तंत्र त्याने तयार केले होते, अशी माहिती कुटुंबाचे आप्तेष्ट रुपाली जाधव यांनी दिली. तर टेंभरी (परसाेडी) गावाला वाॅटर कप स्पर्धेतही त्याने मदत केली हाेती. त्यामुळे त्याला जलयाेद्धा म्हणूनही ओळखले जात, असे वॉटर कप स्पर्धेचे तालुका समन्वयक निखिल आंबुलकर यांनी सांगितले.