गोटमार थांबेना : ग्रामस्थही हैराण आकोली : नजीकच्या हिवरा गावातील काही घरांवर गत एक महिन्यापासून दगड येत आहेत. जनता भयभीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावात पाहणी करून गेले. पोलिसांनीही याबाबत चौकशी केली; पण दगड कुठून येतात याबाबत ठोस निष्कर्षापर्यंत कुणीही पोहोचू शकले नाही. सध्या हा प्रकार सुरूच असून अंनिस व पोलिसांनीही हात टेकले आहे. सेलू तालुक्यातील हिवरा हे थोडे आडवळणाचे गाव. शेती हाच मुख्य व्यवसाय दिवसभर शेतात काबाडकष्ट करून थकलेल्या जीवाला निवांत झोपेची गरज; पण गोटमारीमुळे येथील लोकांची झोप उडाली आहे. कधी कुठून दगड येईल, याचा नेम नाही. आज थांबेल, उद्या थांबेल म्हणत लोक जगत आहे; पण तब्बल एक महिना होऊनही गोटमार थांबलेली नाही. यामुळे ग्रामस्थ हैराण आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अ.भा. अंनिसचे पदाधिकारी गावात येऊन गेले. ते गावात असताना त्यांच्या समोर दगड येऊन पडला होता, असे ग्रामस्थ सांगतात. पोलिसांनीही चौकशी केली; पण काहीही निष्पन्न आले नाही. घरावर पडलेला दगड घरात कसा शिरतो, हे कोडे आहे. कवेलू व टिनातून दगड आत येतात, असे ग्रामस्थ सांगतात. युवकाच्या एका गटाने अनेक रात्री जागून शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण दगड कुठून येतो, कसा येतो, याचा पत्ता लागला नाही. यामुळे युवकांनी रात्रीचे बसणे सोडून दिले. गावातील एका घरी युवकाने आत्महत्या केली होती. त्याच घराकडून दगड येतात, असे सांगणारे अनेक मिळतात. गोटमार सुरुच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. महिला व लहान मुलांती भीती आहे. शासनाने दगड येतात कुठून याचा शोध लावावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
गोटमारसमोर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीसही हतबल
By admin | Published: March 22, 2017 1:02 AM