वर्धा : जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँकेचे खाते क्रमांक ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालय यांच्याकडे द्यावयाचा होता. खाते क्रमांक दिलेल्या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ घेता आला; पण बँकेचा खाते क्रमांक न दिलेल्या शेतकऱ्यांचे खरीप अनुदान प्रशासनाकडे शिल्लक राहिले आहे. शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून आठही तहसीलदारांनी प्रयत्न केले. प्रसंगी जाहिरात देऊनही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले; पण काही शेतकऱ्यांनी अद्यापही खाते क्रमांकच दिला नाही. आता आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने प्रशासनाला उर्वरित निधी परत पाठवावा लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील ३ कोटी २१ लाख ५९ हजार रुपये शासन जमा करावे लागणार आहेत. यासाठीची प्रक्रियाही काहीच दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना माफी
By admin | Published: March 18, 2016 2:27 AM