खासदारांची माहिती : विदेश मंत्रालयाकडे केली होती मागणीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून भारतीय डाक विभाग व विदेश मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातून ३८ पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी प्रदान करण्यात आली होती. या योजनेचा वाढता प्रतिसाद पाहता २७ जुन रोजी १४९ ठिकाणी नवीन पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात वर्धा येथील पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र नसल्याने सर्व नागरिकांना नागपूर प्रादेशिक कार्यालयात ये-जा करावी लागते. ही अडचण लक्षात घेत खा. तडस यांनी १६ नोव्हेंबर २०१६ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय विदेश राज्यमंत्री मेजर जनरल व्ही.के. सिंग यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार ३८ पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र पोस्ट आॅफिसमध्ये सुरू करण्यात आले. लवकरच या योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या उत्तराला अनुसरून खा. तडस यांनी वेळोवेळी वर्धा येथे पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. परिणामी १४९ नवीन पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने वर्धेचा समावेश करण्यात आला आहे. वर्धा येथील पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे कामकाज लवकरात लवकर सुरू करावे, याकरिता विदेश मंत्रालयातील अप्पर सचिव शर्मा यांची भेट घेऊन खा. तडस यांनी विनंती केली आहे. वर्धा येथे पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर करून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा निकाली निघाल्याबद्दल खा. तडस यांनी समाधान व्यक्त केले. शहरात ही सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांचीही नागपूर येथे वारंवार चकरा करण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.
शहरात पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करण्यास मंजुरी
By admin | Published: July 05, 2017 12:25 AM