ठाणेदाराकडून आंदोलकांना मारहाण केल्याच्या आरोप लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : जाम-वरोरा मार्गावरील आरंभा टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढ देण्याकरिता आंदोलन केले. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत पगारवाढ देण्यावरुन झालेली चर्चा फिसकटली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. याकरिता समुद्रपूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी टोलनाका कर्मचारी प्रफुल गोतमारे याला मारहाण केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला तर कारवाई नियमानुसार केल्याचे पोलिसांकाडून सांगण्यात येते. त्यामुळे पगारवाढ आंदोलन चांगलेच चिघळले आहे. टोलनाका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत बुधवारी पगारवाढ देण्यावर चर्चा सुरू होती. पगारवाढीची मागणी मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकासोबत वाद केला. तसेच मारहाण करुन वाहतूक बंद केली. यामुळे व्यवस्थापक गुलाब आहुजा यांनी समुद्रपुर पोलिसांना दुरध्वनी वरुन घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून टोलनाका गाठला. टोलनाका कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन प्रकरण संपविण्याचे आवाहन केले. मात्र आवाहनाला न जूमानता टोलनाका कर्मचारी प्रफुल गोतमारे याने आक्रमक पवित्रा घेतला. यावर पोलिसांनी आपला खाक्या दाखवित वाहतूक सुरू केली. तसेच प्रफुल गोतमारे याला अटक गुन्हा दाखल केला. आपले आंदोलन फसले म्हणून या विवंचनेतून गोतमारे याने पोलिसांवर मारहाणीचा आरोप केल्याचे समजते. गोतमारे याने शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून तहसीलदारांना निवेदन दिले. योग्ग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आरंभा टोलनाका पगारवाढ आंदोलन चिघळले
By admin | Published: May 20, 2017 2:17 AM