चौकशी अहवाल सादर : कारण गुलदस्त्यात आर्वी : गत महिन्यात आर्वी पालिकेच्या गोदामातून चार संगणक संच अचानक गहाळ झाल्याच्या वृत्ताने पालिकेत खळबळ माजली होती. ते शोधण्यासाठी मुख्याध्याधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता संगणक संच परत आल्याचे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद आहे. आर्वी पालिकेत कार्यालयीन कामाना गती देण्यासाठी २० संगणक संच प्राप्त झाले होते. यात उरलेले सात संगणक पालिकेच्या गोदामात ठेवण्यात आले होते. त्यापैकी चार संगणक संच पालिका गोदामातून अचानक बेपत्ता झाले. संगणकांचा पालिका कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू झाला. यामुळे मुख्याधिकारी एच.डी. टाकरखेडे यांनी तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत चौकशी समितीने आपला अहवाल मुख्याधिकारी यांना सादर केला असून गहाळ झालेले संगणक परत गोदामात आढळून आल्याचे त्यात नमूद असल्याची माहिती आहे. हे संगणक संच बेपत्ता होणे व चौकशी सुरू होताच परत येणे हे न उलगडणारे कोडे आहे. संगणक परत आले तरी कारण गुलदस्त्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)
आर्वी पालिकेतील बेपत्ता संगणक संच आले परत
By admin | Published: April 04, 2015 2:09 AM