लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तोंडाला कपडा बांधलेल्या चोरट्यांनी शहरातील शिक्षक कॉलनी भागातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी दरोडा घातला. चोरटे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सेवानिवृत्त शिक्षकावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली. ही घटना शनिवारी रात्री ८.३०च्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. मुरलीधर भोयर असे जखमी सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.याविषयी प्राप्त माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधर व त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या निवासस्थानी दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम बघत असताना अचानक घराची बेल वाजली. भोयर यांनी दरवाजा उघडताच तोंडाला कापड बांधून असलेल्या तीन व्यक्तींनी घरात जबरदस्ती प्रवेश केला. हातात चाकू असलेल्या चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला ढकलत-ढकलत बेडरूमपर्यंत नेले. याठिकाणी चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला बांधून ठेवले. दरम्यान, तीनपैकी एका चोरट्याने मुरलीधर यांची पत्नी शरयू भोयर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व बोटातील अंगठी हिसकावली. शिवाय कपाटातील मंगळसूत्र ताब्यात घेतले. दरम्यान, चोरट्यांनी मधुकर यांच्या गळ्यावर चाकू लावून तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याचे म्हणत दागिन्यांची मागणी केली. मात्र, दागिने घरात नसल्याचे सांगितल्यावर चोरट्यांनी घरातील कपाटाची झडती घेत कपाटातील २० हजारांची रक्कम आपल्या ताब्यात घेतली. यावेळी विरोध केल्याने जवळ असलेल्या चाकूने चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकावर हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. भोयर कुटुंबियांच्या घरी धाडसी चोरी झाल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी भोयर यांचे घरी येत जखमी भोयर दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या चमूला पाचारण करण्यात आले होते.
चोरट्यांचा भोयर यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास राहिला ठिय्या- भोयर यांच्या घरी दरोडा घालणाऱ्या चोरट्यांनी सुमारे दीड तास भोयर दाम्पत्याला दहशतीत ठेवून सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून रोख रककम व सोन्याचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढताना भोयर यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता.
वेळीच लॉकरमध्ये ठेवल्याने काही दागिने चोरट्यांपासून बचावले- हळदी-कुंकूच्या कार्यक्रमानंतर भोयर दाम्पत्याने त्यांच्याकडील काही सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले. त्यानंतर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. दागिने वेळीच लॉकरमध्ये ठेवल्याने काही दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत.
ताेंडाला पडली कोरड; चोरट्याने पाजले पाणी- तोंडाला कापड बांधून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी भोयर दाम्पत्याच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना बांधून ठेवले. दरम्यान, घाबरलेल्या भोयर यांच्या घशाला कोरड पडल्याने त्यांनी चोरट्यांना पाणी पाजण्याची विनवणी केली. अशातच एका चोरट्याने भोयर यांना पाणी आणून दिले, असे भोयर यांनी सांगितले.
भयभीत दाम्पत्याने स्वत:ला सावरत मागितली शेजाऱ्यांना मदत- घटनास्थळावरून पळ काढताना चोरट्यांनी भोयर यांच्या घरातून मोबाईलही पळवले. बराचवेळ चोरट्यांच्या दहशतीत राहिलेल्या भोयर दाम्पत्याने स्वत:ला कसेबसे सावरत मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी भोयर यांच्या घराकडे येत जखमींना रुग्णालयात दाखल केले.