लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा(आर्वी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात होणारा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून ठप्प झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे भर उन्हाळ्यात हाल होत असून, नळाला दोन दिवसांपासून पाणी नसल्याने गृहिणींची पाण्यासाठी चांगलीच फजिती होत असल्याचे चित्र आहे.आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो.शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता किंवा इतर कर्मचारी नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच रणरणत्या उन्हामुळे घाम फुटू लागला आहे. त्यातच पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे.
सहा वॉर्डात पाणीटंचाईचे चटके- या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना, तो आमचा प्रश्न नाही, असे म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. - अनेक वॉर्डात सार्वजनिक नळ व नागरिकांच्या घरात नळाला तोट्या नाहीत. - पाण्याचा अपव्यय होत असताना, दुसरीकडे हमालपुरा, जनतानगर, संजयनगर, साईनगर, वाल्मिक वॉर्ड, मायबाई वॉर्ड येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
कायमस्वरुपी मुख्याधिकारी हवा...- शहराची लोकसंख्या ४५ हजारांवर असताना केवळ एकच टँकर आहे. यामुळे पाणीटंचाई भागात नागरिकांना पाणी मिळत नाही. - कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी सीईओसाहेबांना सांगा, असे सांगून वेळ मारतात. - देवळीकर यांच्याकडे न.प.चा प्रभार असून, प्रशासकीय अधिकारीही लक्ष देत नसल्याची ओरड आहे.
देऊरवाड़ा पंप हाऊसमध्ये यांत्रिकी बिघाडामुळे मजीप्रकडून शहराला पाणी पुरवठा झाला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असून, पाण्याचा वापर जपून करावा, नागरिकांनी सहकार्य करावे. - प्रशांत मूल, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा.
शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी न.प.च्या टँकरने हमालपुरा व जनतानगर येथे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.- सुनील आरिकर, आरोग्य निरीक्षक, न.प.
दोन दिवसांपासून नळाला पाणी नाही. याबाबत पूर्वसूचनाही दिली नाही. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. एकमेव नळाच्या भरवशावर आमचे काम आहे. दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते आहे.- संजय जगताप, नागरिक, जाजूवाडी