ऑनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने झालेल्या दुर्लक्षामुळे तब्बल १,१०८ गावांतील पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा धोक्यात आला आहे. मार्च अखेरीपर्यंत जर या गावांतील पाणी पुरवठा योजनांकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा झाला नाही तर त्यांची वीज कापण्याची तयारी महावितरणच्यावतीने करण्यात आली आहे. यामुळे या गावांत कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात असलेल्या विविध ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकडे फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपयांची थकबाबी असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. त्यांना या देयकाचा भरणा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च देण्यात आली आहे. या दिवसापर्यंत जर ही थकबाकी ग्रामपंचायतींकडून भरण्यात आली नाही तर त्या गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागणार आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेवून नागरिकांकरिता प्रस्तावित असलेली समस्या मार्गी काढण्याकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे.यापूर्वी थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल २५ पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. या ग्रामपंचायतींवर २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. या ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा केला नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे या गावातील नागरिकांना दोर बादली घेवून विहिरीवर आणि काहींना जाम झालेल्या हातपंपावर यावे लागले. नागरिकांच्या सुविधेकरिता ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी तत्काळ भरण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात एकूण थकबाकी २६.५७ कोटी रुपयेमहावितरणच्यावतीने जिल्ह्यातील विविध ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. यात पाणी पुरवठ्यासह शासकीय कार्यालये, पथदिवे, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यापैकी तब्बल ३ लाख ७ हजार ९९७ ग्राहकांकडे एकूण २६ कोटी ५७ लाख ८१ हजार रुपये थकले आहेत. यात सर्वाधिक थकबाकी सार्वजनिक पथदिव्यांची आहे. जिल्ह्यात १४३९ ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये थकले आहेत. तर २ लाख ८१ हजार १२ घरगुती ग्राहकांकडे २ कोटी रुपये थकले आहेत. कृषी पंपांची थकबाकी २ लाख ६२ हजार रुपयांवर आहे. तर १८ हजार ३६७ व्यावसायिक ग्राहकांकडे ९३ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर ग्राहकांवरही मोठी थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत देयकाचा भरणा करण्याच्या सूचना महावितरणने केल्या आहेत.
१,१०८ गावात कृत्रिम पाणी टंचाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:10 AM
उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.
ठळक मुद्दे३.५४ कोटींच्या थकबाकीपोटी कापणार वीज