चैतन्य जोशी
वर्धा : आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाला १२ दिवस उलटले असून अनेक रहस्यमय खुलासे पुढे आले. शनिवारी दुपारच्या सुमारास आर्वी पोलिसांनी पुन्हा कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आल्याने पोलिसांच्याही भुवया उंचाविल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याच्या मशीनने रक्कम मोजण्यात आली असता रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९० लाख रुपयाच्या वर रक्कम पोलिसांकडून मोजण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते.
आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेने संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात कदम रुग्णालयामागील परिसरात असलेल्या बायोगॅस चेंबरमधून १२ मानवी कवट्या अन् ५४ हाडे जप्त करण्यात आली होती.
डॉ. शैलेजा कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी डॉ. कुमारसिंग कदम हे शैलजा कदम यांच्यासोबत नागपूर येथे रुग्णालयात असल्याने ज्या खोलीला कुलूप होते त्याची चावी कुमारसिंग कदमकडे होती. यामुळे पोलिसांनी त्या खोलीला सील लावले होते. मात्र, शनिवारी कदम कुटुंबीयाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली. पोलिसांनी खोली उघडून त्यात काही कागदपत्रं किंवा महत्त्वाचे पुरावे मिळतात काय, याची तपासणी केली असता खोलीत पाच ते सहा कपाटं दिसून आली. पोलिसांनी कपाटं उघडून तपासणी केली असता लाखो रुपयांवर रक्कम आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळून आल्याने रुग्णालयात नेमके चालायचे तरी काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी शनिवारी कदम रुग्णालयात पुन्हा तपासणी करून इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून खोलीची तपासणी केली. खोलीतील कपाटांमध्ये ९० लाखांच्यावर रक्कम आढळून आल्याने ही रक्कम आली कुठून, कुणाची आहे, याचा शोध पोलिसांसह आयकर विभाग घेणार असल्याची माहिती आहे.
आयकर विभागाला पाठविले पत्र
डॉ. रेखा कदम आणि नीरज कदम यांच्या घरात सुमारे ९० लाखाच्यावर रोख रक्कम आढळून आल्याने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिसांनी आयकर विभागाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. अटकेत असलेले डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम, डॉ. कुमारसिंग कदम आणि डॉ. शैलेजा कदम यांची आणखी कुठे संपत्ती तसेच बेनामी मालमत्ता आहे, याचाही शोध आयकर विभागाने घेण्याची गरज आहे.
पोलिसांच्या पत्राला उत्तर देण्यास विलंब
गर्भपात प्रकरण उजेडात आल्यावर आर्वी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रात डाॅ. रेखा कदम ही गर्भपात करीत असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडून रजिस्ट्रेशन केले आहे काय, याची माहिती विनाविलंब देण्यात यावी, रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याची प्रत पुरविण्यात यावी, असे पत्र १३ जानेवारी रोजी पाठविले होते. मात्र, १० दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती देण्यात आली नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
................