लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील गिरड नजीकच्या आर्वी या गावात सध्या डेंग्यू या किटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. गावातीलच तब्बल दहा व्यक्तींचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. आर्वी या गावातील लक्ष्मी बारेकर, दक्ष जांभुळे, रोहन सावसाकडे, आरुषी गुडधे, तेजस बावणकर, स्नेहा कटमुसरे, अंकुश राऊत, सुमित दोडके, स्वयम डडमल यांना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोविड ओसरताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून आर्वी या गावासह समुद्रपूर तालुक्यात डेंग्यू बाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती डेंग्यू निर्मुलनासाठी दुर्लक्षच करीत आहेत.
आर्वीत डेंग्यूने काढले डोके वर; दहा व्यक्तींना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 5:00 AM