गावकऱ्यांनी वाचविले : पत्नीने दिली होती मानसिक त्रासाची तक्रारवर्धा : पती चारित्र्यावर संशय घेतो म्हणून पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे पतीच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला. यात पतीने तक्रार मागे घेण्याची गळ पत्नीला घातली. मात्र तिने याकडे कानाडोळा केला. यामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्वी येथील वाल्मिक वॉर्ड परिसरात उघड झाली.सुरू असलेल्या प्रकाराची माहिती पत्नीच्या आकांताने परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी विहिरीकडे धाव घेत या बाप-लेकाला बाहेर काढून वाचिण्याच्या प्रयत्न केला. यात त्यांना यशही आले. या बापलेकावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या बापाचे नाव अर्जून पाटील असून मुलाचे नाव अमर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक वॉर्डातील अर्जून पाटील व याचा त्याच्या पत्नीशी वाद होता. तो पत्नीच चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणाने दोघांत नेहमीच खटके उडत होते. अर्जून नेहमीच त्याच पत्नीला मारहाण करीत होता. सोबत तिचा मानसिक छळही करीत होता. या जाचाला कंटाळून तीने पती विरोधात आर्वी पोलिसात तक्रार केली. यामुळे पतीच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला. या त्रासातून बचावाकरिता अर्जून तिला पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याची गळ घालत होता. मात्र ती तक्रार घेण्यास ती नकार देत होती. या कारणावरून या दोघांत वाद सुरू झाला. यात मंगळवारी याच कारणावरून दोघांत पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला जावून अर्जूनने आत्महत्या करण्याचे धमकी दिली. यावरही अर्जूनच्या पत्नीने तक्रार मागे घेण्यास नकार दिला. यात संतापलेल्या अर्जूनने त्याच्या चार वर्षीय मुलाला घेवून विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यामुळे त्याच्या पत्नीने त्याचा पाठलाग करणे सुरू केले. बघता बघता अर्जून मुलाला घेवून परिसरातील बेले यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत गेला. त्याने क्षणात विहिरीत उडी घेतली. पतीने मुलासह विहिरीत उडी घेतल्याने पत्नीने जीवाच्या आकांताने आरडा ओरड केली. यामुळे परिसरातील नागरिक मदतीकरिता धावले. त्यांनी विहिरीत उडी घेत या दोघांना विहिरीबाहेर काढले. दोघांनाही उपचारार्थ उपजिल्हा रुगणालयात दाखल केले. या दोघांवरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत पत्नीने आर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती अर्जून विरूद्ध ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
आर्वीत पित्याचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: October 07, 2014 11:38 PM