लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडली आहे.आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने समाजातील दुर्बल घटकालाही चांगले शिक्षण मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिष्यवृत्ती रखडलेल्यांत एससी प्रवर्गातील ४९५, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील ४ हजार ३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्याना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.
एससी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते १०,९९८ अर्ज- एससी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल १० हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ४४९ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर ९ हजार ४४३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी ८ हजार ९५२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, एससी प्रवर्गातील ४९५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते ३१,६९९ अर्ज- ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल ३१ हजार ६९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७ हजार ७५१ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर २७ हजार ६६९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी २३ हजार ६३२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, ४ हजार ३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.
शिष्यवृत्तीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने होते. शिवाय शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. प्राप्त अर्जांची छाननी करून शिष्यवृत्तीची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल.- प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त, समाज कल्याण वर्धा.