वर्धा : लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. दोन महिने आणि २१ दिवसांच्या कालावधीनंतर ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात येताच जिल्ह्यात भूमिपूजनांना वेग आला आहे. जवळपास पावणेतीन महिने रखडलेली विकासकामे आता सुरू होत आहेत.
गेले तीन महिने देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लागला होता. लोकसभा निवडणूक आटोपताच आयोगाने ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात आणली. आचारसंहिता संपुष्टात आल्याचे कळताच जिल्ह्यात पुन्हा विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे. रखडलेली विकासकामे आता वेगाने होऊ लागली आहेत. किमान भूमिपूजन सुरू झाले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणार की नाही, याबाबत मात्र साशंकता आहे. तरीही विकासकामांची लगीनघाई सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे १६ मार्च ते ६ जून दरम्यान तब्बल दोन महिने २१ दिवस संभाव्य विकासकामे थांबली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू झालेली कामे सुरूच होती. आता नवीन विकासकामांचा श्रीगणेशा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांतच जिल्ह्यात कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक विकासकामांचा सपाटा सुरू राहणार आहे. जागोजागी लोकप्रतिनिधींच्या नावांचे फलकही लागणार आहेत. जनतेला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दुरावलेले मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी विकासकामांचा डोस दिला जाणार आहे. विशेषत: ज्या मतदारसंघात मतदारांनी विरोधी कौल दिला, तेथील आमदार आता सजग होण्याची शक्यता आहे.
विधानसभेची तयारी सुरू
लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी सत्ताधारी उमेदवाराला चीत केले. केवळ एका मतदारसंघात त्यांना लीड दिली. सत्ताधारी उमेदवाराला चीत केलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांत त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. या आमदारांना आता पुढील विधानसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे. लोकसभेत विरोधी कौल देणाऱ्या मतदारांना आपल्याकडे परत कसे खेचता येईल, अशी हुरहूर त्यांना लागली आहे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत त्यांना विकासकामांचा सपाटा सुरू ठेवावा लागणार आहे. यातूनच त्यांना विधानसभेची तयारी करावी लागणार आहे.ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता
येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग संभाव्य तारखांची जुळवाजुळव करणार आहे. बहुधा ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आता केवळ तीन ते सव्वातीन महिने उरले आहेत. या सव्वातीन महिन्यांत विरोधी कौल दिलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे पुढील काळात दिसणार आहे.