निधीही खितपत : विषय समितीची सभाच घेतली नाही आष्टी (शहीद) : नगरपंचायतचा कारभार ढेपाळल्याने येथे प्रशासकाची नेमणूक करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कराण गत सहा महिन्यांत विषय समितीची येथे एकही सभा झाली नाही. विकासकामाकरिता आलेला ४.५ कोटींचा निधी दोन वर्षांपासून पडून आहे. याला खर्च करण्याचे सौजन्य नगरपंचायतचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी दाखवत नसल्याने या प्रकाराविषयी नागरिक संताप व्यक्त करीत आहे. आष्टी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. यानंतर आष्टीचा विकास होईल, असे स्वप्न नागरिकांनी पाहिले. मात्र ग्रामपंचायतच बरी अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. येथे विविध समस्यांनी उग्र रूप धारण केले असताना समस्या सोडविण्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान करून शहरवासियांनी विकास करण्याची चाबी दिली. मात्र निवडणुकीपासून आतापर्यंत केवळ तोंड गप्प करून कारभार हाकणे सुरू आहे. यामुळे आष्टीकर संतप्त आहेत. येथे काँग्रेसचे १२, भाजपाचे ६ असे एकूण १८ नगरसेवक आहे. आतापर्यंत झालेल्या सभेत एकमेकांवर निव्वळ आरोप प्रत्यारोप एवढाच उद्योग सुरू आहे. त्यामुळे विकासकामांना येथे खिळ बसल्याचे चित्र आहे. रस्ता अनुदान अंतर्गत सन २०१५-१६ चे २० लक्ष, सन २०१६-१७ चे २० लक्ष असा एकूण ४० लक्ष रूपये निधी प्राप्त झाला. त्यामधून विकासकामे करण्याचा ठराव अद्यापही मंजूर झालेला नाही. त्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या नाही. एकमेकाकडे बोट दाखवून दिवस काढण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप नागरिक करीत आहे. येथील सांडपाण्याच्या नाल्या बुजल्या आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. सार्वजनिक विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकलेले नाही. त्यामुळे जनारोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पथदिवे नाही. या समस्या मार्गी लावण्याचे सोडून आरोप करण्यात येथील पदाधिकारी मग्न असल्याचे दिसते. त्यामुळे विकासाचा बट्टयाबोळ वाजलिा आहे. सहा महिन्यांपासून सभा नाही, ठराव नाही यासाठी नगराध्यक्ष मीरा येणूरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. तर मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी ठराव करण्याचे काम नगराध्यक्ष व नगरसेवकाचे असते. त्यामुळे कामाच्या ई-निविदा करूच शकत नाही, असे सांगितले. यासर्व गोंधळात येथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसत आहे. येथे मनमानी कारभार सुरू आहे. येथे कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याची मागणी आहे. नागरिकांनी समस्या सोडविण्यासाठी कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील विकासकामांना गती देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) विकास कामांच्या ठरावाला मंजुरीची प्रतीक्षा दलित वस्ती विकास योजनेतून २० लक्ष मंजूर झाले. सन २०१५-१६ चा हा निधी खर्च झालेला नाही. तसेच १४ व्या वित्त आयोगामधून घनकचरा व्यवस्थापनाकरिता १ कोटी २५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. त्याचेही नियोजन झालेले नाही. नगरपंचायत ठेव निधीमध्ये २ कोटी वर्षभरापासून पडून आहे. या सर्व कामांना मार्गी लावण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. येथे विविध समस्यांनी डोके वर काढेले असताना याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सभा घेत नाही, सभा झालीच तर केवळ गोंधळाच्या वातावरणात पार पडते त्यामुळे महत्त्वाचे निर्णय होत नाही.
आष्टी नगरपंचायतचा कारभार ढेपाळला
By admin | Published: April 28, 2017 2:04 AM