वर्धा : आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील एका तरुणाला त्याच गावातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याने थेट आष्टी पोलीस ठाण्यात 'सुंदरी' (पोलीसी प्रसादासाठी वापरण्यात येणारा पट्टा)ने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून याला अटक केली. तर आता याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आणि मारहाणीची चित्रफीत तयार करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आरोपी राजेश ठाकरे तसेच सहआरोपी म्हणून पोलीस अंमलदार विनायक घावट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, शिवाय पोलीस अंमलदार विनायक घायवट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केलेल्या सखोल तपासात या प्रकरणाचा व्हिडिओ किनाळा येथील गजानन आंबेकर नामक व्यक्तीने तयार केल्याचे पुढे आल्याने त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विशेष म्हणजे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याने गजानन याला मोबाइलमध्ये चित्रफीत तयार करावयास लावली होती, असे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. गजानन आंबेकर याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.
गुन्ह्यात 'विनायक'ची भूमिका महत्त्वाचीच
सराईत असो वा गुन्हेगारी जगतात नव्याने एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पोलीस स्टेशन म्हटले की धामच फुटतो; पण चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या ताब्यात राहणाऱ्या 'सुंदरी'ने तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी या संपूर्ण घटनेत अंतोराचे बीट अंमलदार विनायक घावट त्याची भूमिका महत्त्वाचीच राहिली आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणाला पोलीस कर्मचारी विनायक यानेच पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर दमदाटी करून त्याला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याच्या हवाली करण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
ठाणेदार गेले होते शेतीचा वाद सोडवायला
या घटनेच्या वेळी आपण अंतोरा गावातीलच शेतकरी केचे आणि खान यांच्यात सुरू असलेला शेतीचा वाद या प्रकरणात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो, असे आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितले असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.