वर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात चोऱ्या करून अमरावती येथे पळ काढणाऱ्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने वर्धेसह खरांगणा येथील चोऱ्यांची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा शहरासह जिल्ह्यात मध्यंतरी चोरीच्या घटना घडत होत्या. या चोऱ्यांची पद्धत सारखीच असल्याने चोरटा एकच असल्याचा संशय पोलिसांना आला. या चोरट्यांचा शोध खरांगणा व वर्धा शहरातील रामनगर ठाण्याचे पोलीस घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला. या तपासात पोलिसांनी संशयावरून अमरावती जिल्ह्यातील सागर उर्फ राजू रतन पवार (२७) रा. चांदूर (रेल्वे) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने रामनगर व खरांगणा पोलीस ठाण्यातील कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीतील १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव किटे, जमादार हरिदास काकड, शिपाई वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला यांनी केली. आरोपीकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
अट्टल घरफोड्या जाळ्यात
By admin | Published: March 12, 2017 12:33 AM