वर्धा व अमरावतीतील गुन्ह्यांची कबुली वर्धा : शहर परिसरातील मंदिरातील दानपेट्या चोरीच्या घटना वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने केवळ वर्धाच नाही तर अमरावती जिल्ह्यातील मंदिरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याजवळून मोबाईलसह पानटपरीचे साहित्य जप्त केले आहे. रूपेश पवार रा. राजूरवाडी, ता. मोर्शी असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या दुकाने तसेच मंदिरातील दानपेटी फोडून नगदी रक्कम तसेच साहित्य चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दरम्यान तळेगाव, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारसवाडा येथील बसस्थानक परिसरात पानटपरी व शेजरी असलेल्या शंकर महाराज मंदिरात चोरी करून ३० हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासादरम्यान चोरीतील मुद्देमाल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील ए.के. पान सेंटरचा मालक अनूप शिंदे याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शिंदे याला विचार केली असता चोरीतील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला. सदर मोबाईल त्याला रूपेश पवार याने दिल्याचे सांगितले. यावरून रूपेशला ताब्यात घेतले असून अनूपकडून चोरीतील एकूण २३ हजार २०१ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. रूपेशला विचारणा केली असता त्याने अमरावती जिल्ह्यासह वाठोडा, उदखेड, सिंबोरा, मार्डा, मोर्शी, बेलोरा, घाटलाडकी अशा ठिकाणी चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, जमादार नरेंद्र डहाके, सचिन खैरकार, तुषार भुते, स्वप्नील भारतद्वाज, चंद्रकांत जिवतोडे यांनी केली.(प्रतिनिधी)
अट्टल दानपेटी चोर गजाआड
By admin | Published: February 05, 2017 12:34 AM