सेलू : शहरातील तीनपैकी दोन एटीएम नोटबंदीपासून बंद आहे. यामुळे ग्राहकांना होणारा त्रास दूर व्हावा म्हणून ‘उघड दार देवा आता’ म्हणत बुधवारी युवासेनेने एटीएमची आरती ओवाळून आर्त हाक दिली. तालुका युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशिनचे पूजन केले. मशिनला हार घालून ‘ओवाळा ओवाळा’ची आरती केली. नोटबंदीपासून बंद असलेले एटीएमचे दार उघडण्यासाठी अखेर ‘हे देवा या अधिकारी व प्रशासनाला सद्बुद्धी दे’, अशी प्रार्थना करीत ‘उघड दार देवा आता’ असे म्हणत बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सात दिवसांच्या आत एटीएम सुरू न झाल्यास या केंद्रासमोरच आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला. हे आंदोलन लक्षवेधक ठरले. एटीएम बंद असल्याने बँकेत पाय ठेवण्यास जागा नसल्याचे चित्र होते. वृद्धांसाठी वेगळा कक्ष असला तरी सिमेंटच्या तप्त रस्त्यावर उन्हाच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. बँकेत १० हजारांपेक्षा अधिक रुपयांचा विड्रॉल होत नाही. हा त्रास त्वरित दूर करावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात युवासेनेचे प्रशांत झाडे, शिवसेनेचे सुनील पारसे, रवींद्र चव्हाण, अमर गुंदी, विजय चव्हाण, आकाश तावडे, मुकेश चव्हाण यासह कार्यकर्ते व ग्राहक सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
युवा सेनेने ओवाळली बंद एटीएमची आरती
By admin | Published: April 06, 2017 12:07 AM