वर्धा : आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम कार्डचा वापर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. कमी वेळात आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी म्हणून बँकेच्या अनेक ग्राहकांकडून या सेवेचा वापर केला जातो; मात्र ही सेवा दिवसेंदिवस ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे प्रत्ययास येत आहे. बरेचदा तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना या सेवेचा उपभोग घेता येत नाही. कधी एटीएम मशीनमधून रोकडच येत नाही, अशा स्थितीत ग्राहकांनी बँकेच्या कर्मचार्यांकडे मदतीची मागणी केली तर त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. याबाबत अनेक ग्राहकांनी नेवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रक्कम खात्यातून विड्रॉल झाल्याचे दाखविण्यात येते. पण कॅश मात्र मिळतच नाही. या संदर्भात संबंधित बँकेच्या अधिकार्यांकडे तक्रार केली असता ज्या बँकेच्या एटीएमच्या मशीनचा वापर केला तिथे तक्रार करा असा सल्ला दिला जातो. यानंतरही ग्राहक सुचनांचे पालन करतात. मात्र तिथेही कोणतीच मदत न मिळता रिकम्या हाताने परतावे लागते. बँकेच्या अधिकार्याकडून ही बाब आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून टोलवून दिले जाते. या सर्व प्रक्रीयेत बँकेत केवळ हेलपाटा मारण्याखेरीज हाती काहीच लागत नसल्याची स्थिती आहे. बर्चदा ग्राहकांची तक्रार घेण्यास नकार दिला. जातो. शिवाय शहानिशा न करता त्यांना बँकेतून घालवून दिले जाते. यात ग्राहकांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. ग्राहकांच्या सुविधेकरिता तयार केलेली एटीएम सेवा आता ग्राहकांकरिता आता डोकेदुखी ठरत आहे. ग्राहकांनी यासंदर्भात तक्रार दिली तरी बँकेच्या कर्मचार्यांकडून बरेचदा हेटाळणी केली जाते. ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असे ब्रीदवाक्ये असलेल्या या बँकांमध्ये बरेचदा ग्राहकांना याउलट प्रत्यय येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील खातेधारक तासनतास रांगेत उभे राहूनच व्यवहार करण्यास पसंती देतात. एटीएम मशीनचा वापर करून वेळ वाचविताना मनस्ताप नाहक सहन करावा लागत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
एटीएम ठरतात ग्राहकांसाठी डोकेदुखी
By admin | Published: May 30, 2014 12:20 AM