लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परिस्थितीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेली असताना अधिक प्रमाणात दिसून येते.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशी पिकाला पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेली जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी शेतकऱ्यांनी आकस्मिक मर रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तजेलदारपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तसेच सुकल्यासारखे दिसते. त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने, फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळी पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बाँडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मुळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडाला हमखास नवीन फूट येते. त्यामुळे या रोगाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम अधिक युरिया २०० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रति झाड २५० ते ५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डीएपी २०० ग्रॅम १० लिटर पाण्यात आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
मर रोगाबाबत उपाययोजना...कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकाला प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालीलपैकी आळवणी करावी.