वर्धा : जिल्ह्यात २ लाख १९ हजार ३२ हेक्टरवर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून थांबूनथांबून कोसळत असलेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनी ठरला आहे; पण याच पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील विविध भागांतील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे एकरी दोन कामगंध सापळे लावणे गुलाबी बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील विविध भागांतील कापूस पीक सद्य:स्थितीत पात्या, फुले तसेच बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. केळापूर येथे काही कृषी तज्ज्ञांनी थेट शेतात जात पाहणी केली असता कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून आला. सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. नीलेश वझिरे, तालुका कृषी अधिकारी सारिका ढुके यांनी शेतकरी शीतलसिंग धुमाळ व कुलदीपसिंग बैस यांच्या शेतात पाहणी केल्यावर कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. अशीच काहीशी परिस्थिती इतरही भागांत फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.
तज्ज्ञांना काय दिसले?
शेतकरी धुमाळ व बैस यांच्या शेतातील कपाशी पिकाची बारकाईने पाहणी केली असता फुलामध्ये पांढुरक्या, तसेच गुलाबी रंगाच्या अळ्या दिसून आल्या. ज्या फुलांमध्ये ही अळी आहे, अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, अशा डोमकळ्या दिसून येत आहेत. सदर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आला असल्याने शेतकऱ्यांनीही किडीचे सर्वेक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी एकरी २ कामगंध सापळे उभारून त्यानंतर पिकाचे निरीक्षण करून शिफारशीनुसार गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
- डॉ. जीवन कतोरे, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा
जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी कपाशी पिकाचे सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ५ ते १० टक्के दिसून आल्यास शिफारशीनुसार किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
- डॉ. नीलेश वझिरे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा.