वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नाही तर राज्यातील सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा जिल्ह्यातील शिरपूर गावात झालेल्या सभेत दिला.तिसऱ्या दिवशी पदयात्रा वर्धा जिल्हयात पोहोचली त्यावेळी शिरपूर गावामध्ये सभा झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारच्या काळात ७० हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली, ती सुद्धा कोणताही कागद भरून न घेता. परंतु या भाजपा सरकारने ऑनलाइनच्या नावाखाली लोकांना खेपा मारायला भाग पाडले आहे. हे सरकार खोटं बोलते पण रेटून बोलते, त्यामुळे मी या सरकारला खोटारडे सरकार असे नाव दिल्याचे सांगितले.सभेला मोठया प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. शिवाय अंगणवाडी सेविका संघटनाही उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करेल.आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये सरकारला धारेवर धरतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाठीशी राहील, असेही स्पष्ट केले. दरम्यान, खोटारडया सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्याविरोधात नागपूरवर महिलांच्यावतीने लाटणे मोर्चा काढणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, वर्धाचे माजी आमदार सुरेश देशमुख, युवक प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, महिला जिल्हाध्यक्ष शरयू वांदिले, प्रवक्ते महेश तपासे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, मनिषा मोटे आदींसह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 7:58 PM