खळबळ : जाहीर सभांसाठी स्टार प्रचारक नेत्यांकडून सावधगिरी वर्धा : जिल्ह्यातील वायगाव(नि.) गटात भाजपश्रेष्ठींनी लैंगिक शोषण आणि गर्भपात घडवून आणले, असे गंभीर आरोप असलेले मिलिंद भेंडे यांना पक्षांतर्गत विरोध डावलून उमेदवारीची माळ घातली. ऐन निवडणुकीच्या काळात भेंडे यांचे हे कृत्य अधोरेखित करणाऱ्या ‘आॅडिओ क्लिप’ व्हायरल झाल्याने भाजपात कमालीची अस्वस्थता पसरली असून जनमाणसातही नाराजीचा सूर उमटत आहे. याच अनुषंगाने वायगाव(नि.) गटात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाचे स्टार प्रचार सावध भूमिका घेऊन असल्याचे ऐकायला मिळत आहे. सुमारे २४ आॅडिओ क्लिप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांना गतीने ‘पोस्ट’ केल्या जात आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर भाजपश्रेष्ठींपर्यंत या आॅडिओ क्लिप पोहचल्या असून सर्वत्र याचीच चर्चा सर्वत्र रंगत आहे. वर्धेतील रहिवासी असलेले मिलिंद भेंडे यांनी वर्धा तालुक्यातील तळेगाव(टा.) गटातून मागील पंचवार्षिक निवडणूक जिंंकली. गेल्या अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली. तेव्हा भेंडे यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदी वर्णी लागली. फेब्रुवारी २०१६ मध्ये एका महिलेने त्यांच्याविरुद्ध आपले १२ वर्षांपासून लैंगिक शोषण करीत अनेकदा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याची तक्रार केली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भेंडेला विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान, भेंडेंना महिनाभर तुरुंगाची हवा खावी लागली. या प्रकरणात जनमाणसात भाजपची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहुन अखेर भाजपश्रेष्ठींनी भेंडे यांना सभापती पदावरुन पायउतार केले. या प्रकरणाची धग कायम असताना, भाजपश्रेष्ठींनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या गळ्यात वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) गटातून उमेदवारी बहाल केली. या उमेदवारीबाबत पक्षात कमालीचा विरोध झाला. पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचा भेंडेंसाठी राजकीय बळी घेऊन भेंडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली गेली. भेंडे यांच्या उमेदवारीवरुन भाजपासह जनमाणसातही कमालीची नाराजी पसरली. आरोपीला उमेदवारी देऊन त्यांच्यावरील आरोपाचे पक्षाने समर्थनच केल्याचा सूरही उमटत आहे. अशातच भेंडे यांच्या त्या कृत्यावर प्रकाश टाकणारी भेंडे व पीडिता यांच्यातील संवाद ‘आॅडिओ क्लिप’च्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहे. या क्लिपमध्ये पीडिता ही भेंडेंना, ‘तुने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आतापर्यंत १२ गर्भपात करायला लावले. तुझ्यामुळे मी दुसरे लग्न करू शकले नाही.’ असे संवाद ऐकायला मिळते. भेंडेही कधी तिला शिवीगाळ तर कधी सावरासावर करतानाचे संवाद ऐकायला मिळते. ही ‘आॅडिओ क्लिप’ अनेकजण आपापसात पोस्ट करुन तोंडसुख घेत आहे. यामुळे जिल्ह्यात भाजपची कमालीची नामुष्की होत असल्याचे चित्र आहे. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी तर तोंडात बोटेच घातली. या आॅडिओ क्लिप पक्षश्रेष्ठींकडे पोहचविल्या जातील, असे ते म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी) कशाला अडचण वाढवता याबाबत मिलिंद भेंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता. त्यांनी सुरुवातीला आपल्या आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या वृत्ताचा इंकार केला. नंतर त्यांनी या विषयावर बातमी करताहेत का असे विचारले. त्यांना होय म्हटल्यानंतर त्यांनी आता राहु द्या ना कशाला मला अडचणीत आणता, असे बोलल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रीया दिली. यानंतर त्यांनी स्वत: भ्रमणध्वनी करुन मी भेटायला येतो म्हणाले. आॅफिसमध्ये या म्हटल्यावर घराकडे या म्हणाले. त्यांना आॅफिसमध्ये येण्याचा आग्रह धरला तर आॅफिसमध्ये बोलता येईल का असेही ते म्हणाले. नंतर त्यांनी ठीक आहे म्हणून फोन ठेवला.
भाजप उमेदवाराची लैंगिक शोषणाची ‘आॅडिओ गाथा’ व्हायरल
By admin | Published: February 12, 2017 12:58 AM