कुटुंबीय त्रस्त : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : नजीकच्या मदनी येथील वॉर्ड क्रमांक चारमधील घरावर आजीच्या मृत्यूनंतर वारसान हक्क चढविणे गरजेचे होते. यासाठी अर्ज करण्यात आला. मृत्यूपत्रासह संपूर्ण कागदपत्रे दिली; पण नऊ महिन्यांपासून कारवाईच झाली नाही. यामुळे वानखेडे कुटुंब त्रस्त झाले आहे.मदनी येथील विठाबाई लक्ष्मण वानखेडे यांचा १८ सप्टेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या नावावर मौजा मदनी वॉर्ड क्र. चारमध्ये मिळकत क्र. ३५ हे घर होते. विटा-मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या या घरामध्ये चार सदस्यांचा वारसा हक्क आहे. यामुळे सदर घराच्या कागदपत्रांमध्ये वारसान हक्क चढविण्यासाठी रंजीत विलास वानखेडे यांनी आमगाव ग्रा.पं. प्रशासनाकडे २४ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज केला. संपूर्ण कागदपत्रेही सादर करण्यात आली; पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत ग्रामपंचायत सचिवांना अनेकदा निवेदने सादर केली; पण वारसान हक्क चढविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे रंजी वानखेडे यांनी २५ मे रोजी सेलू पं.स. चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शिवाय ४ जून रोजी स्मरणपत्र दिले; पण अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वानखेडे कुटुंबीय त्रस्त आहे. वरिष्ठांनी लक्ष देत न्याय द्यावा, अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
वारसान हक्क चढविण्यासाठी टाळाटाळ
By admin | Published: June 07, 2015 2:23 AM