निम्न वर्धा कालवे विभागाचे आयोजन : साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभागदेवळी : विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा, यशवंत कन्या माध्यमिक शाळा, राजीव गांधी माध्यमिक शाळा, गुरुकुल विद्या निकेतन आदी शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष शोभा तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने फिरून रॅलीने प्रबोधन केले. पाणी वाचवा, जीवन वाचवा, बचत पाण्याची गरज काळाची आदी घोषणा देवून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.रॅलीचा समारोप श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस व अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवा, उपविभागीय अधिकारी अशोक पावडे, सहाय्यक अभियंता गजानन घुगल, आर.आर. बोडेकर, अमोल चंदावार व सु.मो. इंगळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार यांनी केले. यशस्वीतेसाठी शाखा अभियंता प्रमोद पावडे, ज्ञानेश्वर सोळुंके, विश्वेश्वर कडू, सुनील रोहणकर, प्रशांत बन्सोड यांंच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक तसेच निम्न वर्धा कालवे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)निकड लक्षात घेता अनेक योजना कार्यान्वित - तडसभविष्यात पाण्याची निकड लक्षात घेता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. सन १९८० पासून रखडलेला लोअर वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेला पूनर्जिवीत करून शिवारातील तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३८ हजार कोटीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रा.पं. ला ८० लाखाचा निधी देऊन गावातील नळयोजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मनरेगा तसेच जलयुक्त शिवार योजनाचे माध्यमातून शेतातील विहिरींचे बांधकाम तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व योजना गावापर्यंत नेवून नागरिकांना दिलासा दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देवळीत जलजागृती रॅलीतून प्रबोधन
By admin | Published: March 18, 2016 2:21 AM