लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेद्वारे राजकीय साक्षरतेसाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ' या अभियानाची संयुक्त बैठक स्थानिक राष्ट्रीय युवा संगठन कार्यालयात घेण्यात आली. येत्या ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात होत असून, सर्वसमावेशक नियोजनाबाबत विविध परिवर्तनवादी व समविचारी सामाजिक राजकीय संघटनांशी या बैठकीत चर्चा केली.
समाजात राजकीय साक्षरता रुजविण्याच्या उद्देशाने अ. भा. अंनिसद्वारे सेवाग्राम येथे नुकतीच वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महाराष्ट्रातील सुमारे ६० वक्ते सहभागी झाले होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांसह आपली कर्तव्ये, संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. भारताचे संविधान आणि स्वातंत्र्याचा राजकीय इतिहास याबाबत समाजमनात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे अभियान आहे. नवमतदार युवक, युवतींनी उत्तम नागरिक बनण्यासाठी संविधान समजून घेण्याची आवश्यकता असून, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरही संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्यातही विविध महाविद्यालयांत 'भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामीण आणि शहरी भागात लहान व मोठ्या जाहीर जनजागर सभांचे आयोजन 'अंनिस'द्वारे करण्यात येणार असून, त्यासाठी विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला शाखा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, भारत जोडो अभियानचे विदर्भ संयोजक अविनाश काकडे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, माकपा नेते यशवंत झाडे, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सुभाष खंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. खलील खतीब, संदीप किटे, प्रदीप वानखेडे, राष्ट्रवादी किसान सभेचे संजय काकडे, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार, विनेश काकडे, राष्ट्रीय युवा संघटनचे प्रशांत नागोसे, दिनेश प्रसाद, भारतीय लोकशाही अभियानचे अतुल शर्मा, सुषमा शर्मा, मालती देशमुख आदी उपस्थित होते.
गावागावांत करणार जनजागृती...संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्र बचाव हे अभियान राबविण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत बैठक घेण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे. नुकतीच बैठक पार पडली असून येत्या काही दिवसांत राजकीय साक्षरता करण्यासाठी बैठकींचे आयोजन केले जाणार आहे.