प्रशासनाचे दुर्लक्ष : नियंत्रणाअभावी वृक्षतोड जोमात आर्वी : तालुक्यातील वर्धमनेरी, खानवाडी, रानवाडी, वाढोणा, बेढोणा, हिवरा, नांदपूर, देऊरवाडा, खुबगाव, धनोडी, वाई या परिसरत बहुगुणी समजल्या जाणाऱ्या बाभूळीचे बन पाहायला मिळते. ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा बाभूळीची अनेक झाडे असतात. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या झाडावर कुऱ्हाड चालत असून सततच्या वृक्षतोडीमुळे परिसरातून बाभूळीचे झाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात बाभूळ वृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. गावागावात झाडे विकत घेणाऱ्या दलालांचे पेव फुटले आहे. शेतकऱ्यांकडून ही झाडे अल्पश: किंमतीत खरेदी करुन परवानगी न घेताच तोडल्या जात असल्याचा प्रकार सुरू आहे. मात्र यावर कुणाचे नियंत्रण नसल्याचे हा प्रकार वाढला आहे. शेताच्या धुऱ्यावर बाभूळीचे झाड अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. या झाडाचा वापर अल्प प्रमाणात होत असल्याने परिसरातील झाडे मोठ्या प्रमाणात कापली जात असल्याचे पाहायला मिळते. आर्वी येथील महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असून याला आळा घालण्याची मागणी तालुक्यातील नागरिक करतात. ग्रामीण याप्रकारचे दलाल मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याचे दिसून येते. सागवान, कडूनिंब आदी झाडे कापल्यास त्वरीत कारवाई होते. तुलनेने बाभूळीच्या झाडाला कमी महत्त्व असल्याने या ठेकेदारांनी बाभूळबनाकडे मोर्चा वळविला आहे. तसेच शेतालगतच्या कडूलिंब झाडांची सर्रासपणे कत्तल होत आहे. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास हा प्रकार असाच सुरू राहील अशी भिती व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून, त्यामुळे या वृक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी हे कर्मचारी या बाबींकडे कानाडोळा करीत आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने वृक्षतोड करणाऱ्यांचे फावले आहे. अवैध वृक्षतोडीला वेळीच लगाम घालण्याची गरज नागरिक व्यक्त करतात. महसूल विभागाने याची वेळीच दखल घेत कारवाई करणे अगत्याचे ठरत आहे.(शहर प्रतिनिधी) वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर बाभूळ हे बहुगुणी झाड असून या झाडापासून मानवाला उपयुक्त ठरतील असे जिन्नस मिळतात. शिवाय बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो. टणकदार लाकूड म्हणून यांची ओळख असल्यामुळे इमारतीच्या कामात याचा वापर होतो. या झाडापासून उपलब्ध होणारा डिंक महत्त्वपूर्ण असतो. गावागावातून हा डिंक गोळा केला जातो. यावर अनेकांचा उदरनिर्वाह आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण फिरुन हा डिंक गोळा करतात. या झाडाला लागणाऱ्या शेंगा जनावरांसाठी उपयुक्त असतात. जनावरांचा चारा शेंगा आणि पाला अतिशय उपयुक्त ठरतो.
बाभूळबनाची अवैध कत्तल सुरूच
By admin | Published: August 20, 2016 2:07 AM