हनुमान टेकडीवर वृक्षारोपण : युवा सोशल फोरम व वैद्यकीय जनजागृती मंचचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून बाबुजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. सोबतच येथील हनुमान टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.लोकमत जिल्हा कार्यालय आणि युवा सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी १० वाजता झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्या हस्ते बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिर सुरू झाले. लोकमतच्या वतीने आयोजित या शिबिरात संकलित होणारे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजवंतांच्या कामी येणार असल्याचे विचार यावेळी डॉ. मडावी यांनी व्यक्त केले. या शिबिरात एकूण १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य डॉ. चकोर रोकडे यांच्या मार्गदर्शनात संजय बेदलवार, प्रविण गावंडे, उज्ज्वला लामसोंगे, जयश्री पाटील व किशोर महाजन यांनीे केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि डोनर कार्ड देण्यात आले. रक्तदान शिबिरास प्रारंभ झाल्यानंतर जिल्हा कार्यालयात बाबुजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिथी म्हणून युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, मिलिंद मोहोड यांच्यासह लोकमतचे शाखा व्यवस्थापक उमेश शर्मा, जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यानंतर हनुमान टेकडी परिसरात वैद्यकीय जनजागृती मंचच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला वैद्यकीय जनजागृती मंचचे श्याम भेंडे, आनंद बोबडे, अरविंद सरदार, विलास बरडे, डॉ. आनंद गाढवकर यांची उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमांना निवेश तळवेकर, श्याम बोटकुले, निर्भय किनकावकर, विवेक डेहनकर, सचिन हजारे, आशिष पावडे, राहुल ढोके यांचे सहकार्य लाभले.
रक्तदानातून बाबूजींना आदरांजली
By admin | Published: July 03, 2017 1:45 AM