वर्धा : स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीने जोर धरला होता. ब्रिटिश हुकुमतीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तरुणाई महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात एकवटली होती. दरम्यान, १९४१ साली अवघ्या १७-१८ वर्षाच्या वयात लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांनी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींची भेट घेऊन वैयक्तिक सत्याग्रहासाठी विशेष परवानगी घेतली होती. यंदा बाबुजींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे, हे विशेष.
यानिमित्ताने लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी आपल्या मित्रांसमवेत सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी बापू कुटी, बा कुटी, आदी निवास, अखिरी निवास या प्रमुख स्थानांना नमन केले. या पावनभूमीला आपण यापूवीर्ही अनेकदा भेट दिली आहे. मात्र, बाबुजींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना सेवाग्राम आश्रमाच्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे बीजारोपण ज्या भूमीतून झाले ती पावनभूमी आजही सर्वांना नवी ऊर्जा प्रदान करते. आश्रमाचा हा परिसर म्हणजे एक ऐतिहासिक विचारकोष आहे, असेही ते म्हणाले. आश्रम परिसरात राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सिद्धार्थ उंबरकर यांनी सूतमालेने स्वागत केले. त्यानंतर आश्रमात सूतकताई करून त्यांनी बापूंना आदरांजली वाहिली. यावेळी सुभाष झांबड, जितेंद्र कक्कर, नगीन संघवी, पंकज फुलपगार, अनिल इरावने, अजित मुथियान, शरद परिहार, अमरावती लोकमतचे युनिट हेड सुशांत दांडगे, वृत्तसंपादक गजानन चोपडे, वर्धा हॅलो हेड अभिनय खोपडे आदी उपस्थित होते.