गावाला पुराचा धोका : उथळ पात्रामुळे लगतच्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता त्यांचे पात्र जपणे गरजेचे आहे; पण बहुतांश नद्यांच्या पात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नद्याच धोक्यात आल्याचे चित्र आहे. गावालगत वाहणारी भदाडी नदीही झाडा-झुडपांच्या विळख्यामुळे धोक्यात आली असून नदी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे. गावाला लागून वाहणाऱ्या भदाडी नदीमध्ये सध्या सर्वत्र बेशरमची झाडे वाढल्यावचे दिसून येते. उन्हाळा असल्याने नदी पात्र कोरडे पडले आहे. काही प्रमाणात पाणी असले तरी अनेक ठिकाणी डबके साचले आहे. त्यावर शेवाळ तयार झाल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे पाहावयास मिळते. नदी पात्र बेशरमच्या झुडपांनी पूर्णत: बुजलेले आहे. अनेक ठिकाणी उंचवटे तयार झाल्याने पात्र उथळ झाल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नदी पात्रात बेशरम वाढल्याने तथा पात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नाही. शिवाय शेतपिकांनाही मोठा धोका निर्माण होणार आहे. यामुळे नदी साफ करणे गरजेचे आहे. शिवाय जलयुक्त शिवार अभिभयानांतर्गत नदी पात्राचे रूंदीकरण, खोलीकरण आणि सरळीकरण करणे गरजेचे झाले आहे. नदी पात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाची गरज जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मृत जलस्त्रोत जिवंत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. देवळी तालुक्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पही यात समावेशित करण्यात आला आहे; पण लहान-मोठ्या नद्यांचा फारसा विचार केला जात नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, अनेक नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भदाडी नदीचे पात्र बेशरमची झुडपे आणि मातीमुळे उथळ झाले आहे. अनेक ठिकाणी डबके साचले आहे. यामुळे गावाला व शेतपिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत भदाडी नदीचेही पुनरूज्जीवन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करावे, अशी मागणी चिकणी, जामणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.
बेशरमच्या झुडपांमुळे भदाडी नदी पात्र झाले डबके
By admin | Published: May 08, 2017 12:42 AM