वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांचा मुक्काम राहिला. सोमवार आणि मंगळवारी शिंदे यांनी जंगल सफारी करून ‘काय झाडी, काय डोंगर’ असे काहीसे म्हणत बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे दर्शन घेतले. बोरच्या जंगल सफारीदरम्यान त्यांना सांबर, चितळ, नीलगाय, रानकुत्रे आदी वन्यजीवांची त्यांना सायटिंग झाली. असे असले तरी बोरची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-३ ‘कॅटरिना’ नामक वाघिणीने त्यांना हुलकावणीच दिली. निसर्ग, वन्यजीव आणि वृक्षप्रेमी असलेल्या अभिनेता सयाजी शिंदे बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता बघून भारावून गेले होते.
करई संरक्षण कुटीत वृक्षलागवड
अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील करई संरक्षक कुटीत विविध प्रजातींची पाच वृक्ष लावली. वृक्ष लागवडदरम्यान त्यांनी पिंपळ, वड, उंबर, आवळा आणि सीताअशोक ही झाडे लावून वृक्ष लागवडीसह वृक्षसंगोपनाचा संदेश दिला. यावेळी बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, बीड येथील वन्यजीव प्रेमी सिद्धार्थ सोनवणे, हिंगोली येथील मंगेश दळवी आदींची उपस्थिती होती.