देवळी: संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट येथील सपना प्रवीण राडे हिला जाळून मारल्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होती. जिल्हा सत्र न्यायाधीश चांदेकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जामीन नामंजूर केला. पोलीस सुत्रानुसार, देवळी येथील वामन रघाटाटे यांची मुलगी सपना हिचा विवाह हिंगणघाट येथील प्रवीण राडे याच्याशी करण्यात आला. लग्नाला तीन वर्षांचा कालावधी होवून सुद्धा सपनाचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. सततची मारहाण केली जात होती. यातच सपनाचा जळून संशयास्पद मृत्यू झाला. सर्व घटनाक्रम तपासल्यानंतर मुलीचे वडील रघाटाटे यांनी सपनाचा मृत्यू हा आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी नियोजनबद्ध खून केल्याचा आरोप केला. यावरून आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण राडे (पती), प्रभाकर राडे (सासरे), आशा राडे (सासू) व विनोद बोरकर (मामसासरे) यांच्यावर भादंवि ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यात आरोपींनी तात्पुरता जामीन मिळविला. प्रकरणातील सखोलता लक्षात घेवून मामसासरे बोरकर यांच्या व्यतिरिक्त पती, सासरे व सासू यांचा जामीन नामंजूर केल्याने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी सुत्रे हलविली आहे.(प्रतिनिधी)
सपना हत्याकांडातील आरोपींचा जामीन नामंजूर
By admin | Published: February 04, 2017 12:21 AM