लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता, तर दुसरीकडे कोरोनाची भीती, या दुहेरी संकटात ते सापडले आहेत.
लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्याअर्थाने लग्न सोहळ्याची सुरुवात होते;पण दोन वर्षांपासून लग्न समारंभासारखे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत, मोजक्या नातेवाईकांत पार पाडण्याचे शासन आदेश आहेत. पण बाकी रितीरिवाजाला, डामडौलाला फाटा दिल्याने त्यांच्या पोटावर पाय आला आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून, ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही.
ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटले तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.
बांगडी व्यवसाय कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हॅन्डग्लोज वापरून करता येणे शक्य नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व ते जगू शकतील.
शेख अशफाक, बांगडी व्यावसायिक, समुद्रपूर
परडी-टोपल्या व्यावसायिक अडचणीत
उन्हाळ्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या टोपली, परडी, सूप या वस्तूंना मागणी वाढत असते. लग्नसराईत या टोपल्या तसेच सुपाला विशेष महत्त्व असते. परंतु लाॅकडाऊनमुळे हे व्यावसायिक मोडकळीस आले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी बनवलेले पदार्थ या बांबूपासून बनविलेल्या परड्यावर सुकवायला घालायची प्रथा आहे. तसेच शेतमाल काढल्यानंतर शेवटी शिल्लक असलेला मातीमिश्रित शेतमाल या टोपल्याद्वारे ओला करून साफ केला जातो, जेणेकरून यांच्या बनावटीमुळे माती गाळली जाते व शेतमाल शिल्लक राहतो, परिणामी त्याचे पैसेही शेतकऱ्याला मिळतात. परंतु उन्हाळ्यात डोक्यावरून या वस्तू विक्रीसाठी फिरणारे आता मात्र दिसेनासे झाले आहे