दिलीप चव्हाण
सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देऊन मनाला शांती मिळाली. बापूंची जीवनशैली साधी होती. बापू दुसऱ्यांसाठी जगले. दुसऱ्याला समाधान देत त्यांचं दुःख कमी करण्यासाठी आयुष्यभर आपले जीवन समर्पित केल्याचा अभिप्राय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापू कुटीला भेट दिल्यावर नोंदविला.
सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी ४.२० वाजता भेट दिली. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ. डॉ. पंकज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना. दीपक केसरकर यांचे स्वागत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा, मंत्री प्रदीप खेलुरकर, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल यांनी सूतमाळ देऊन केले. याप्रसंगी सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत, ग्रामविकास अधिकारी कैलास बर्ढिया यांनी सेवाग्रामवासीयांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना सूतमाळ व चरखा भेट दिला. आश्रमातील विविध स्मारकांची माहिती मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, चतुरा रासकर, शेख हुसैन, अविनाश काकडे, एकनाथ रोडे, सिध्देश्वर उंबरकर, आकाश लोखंडे, नामदेव ढोले, दिलीप पाटील, दीपाली उंबरकर, अश्विनी बघेल, रूपाली उगले, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.