लोकमान्य टिळकांच्या हस्ते १८९९ मध्ये झाली होती श्रींची स्थापना : नव्या सदस्यांकडूनही तोच दर्जा राखण्याचा प्रयत्न प्रफुल्ल लुंगे सेलू लोकमान्य टिळकांनी समाजाला जागृत करून स्वराज्यासाठी लढा उभारण्याच्या दृष्टीकोणातून जनतेत स्फुल्लींग चेतवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला. सेलू येथेही स्वराज्याच्या विचाराने भारावलेल्या त्या काळातील लोकांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून त्याच्यांच हस्ते १८९९ ला सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्याचे निश्चित केले. त्यावेळी समाजातील बारा लोकांनी एकत्र येवून गणेश उत्सवासाठी मंडळ तयार केले. त्यामुळे त्या मंडळाचे नावच बारभाई गणेश मंडळ असे झाले. आज ११६ वर्षांची परंपरा जोपासत यंदा ११७ व्या वर्षी त्याच थाटात गणेशाची स्थापना होणार आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा सातत्याने टिकवून ठेवण्याचे काम तिसरी पिढीही तेवढ्याच श्रध्देने करीत आहे. सर्व जातीधर्माचे लोक या मंडळात सहभागी असल्याने आपोआपच आध्यात्मिक कार्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेचे जतनही केल्या जात असून बारभाई हे नावच सार्थकी ठरत आहे. सुरुवातीच्या काळात विविध कार्यक्रम, उत्सव व भव्य महाप्रसाद, प्रचंड लवाजम्यात साजरा व्हायचा. नवी पिढी हा उत्सव धार्मिकता व विधिवत पुजाअर्चा याचे भान ठेवत साधेपणाने साजरा करतात. महाप्रसादाचे भव्य आयोजन तेवढ्याच श्रध्देने आजही सुरू आहे. मंडळाचे नाव बारभाई असले तरी मंडळाचा कारभार ‘बारभाई’ नाही, तर अत्यंत शिस्तबध्द आहे. उत्सवासाठी दरवर्षी उत्सव मंडळाची स्थापना होवून कार्यकारिणी निवडण्यात येते. दरवर्षीची भव्य व देखणी मूर्ती वेगवेगळे भाविक श्रध्देने स्वत:हून देतात. यासाठी इच्छुकांना दोनचार वर्षे आधीच आपली इच्छा प्रगट करावी लागते. इतके इच्छुक मूर्तीसाठी श्रध्देने तयार असतात हेही बारभाईची उपलब्धीच आहे. येथील मारवाडी मोहल्यात या गणपतीची स्थापना होते. भव्य अशी आकर्षक मूर्ती व तिची विधिवत स्थापना सातत्याने सुरू आहे. काही वर्षांपूर्वी या गणपतीच्या विसर्जनाला सांस्कृतिक वारसा जोपासत विविध कार्यक्रम व्हायचे आता हा उत्सव साधेपणाने सुरू आहे. ११७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या बारभाई गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तिसऱ्याही पिढीतील निकोप एकजुट या उत्सवाचे सातत्य टिकवून आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गणेश मंडळाला भेट देणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. मंडळाकडून मिळणार घरगुती गणपतींना पारितोषिक यंदा बारभाई गणेश मंडळाने घरघुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा आयोजीत केली आहे. घरघुती मूर्तीचे फोटो काढून मंडळाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकायचे आहे. त्यातील निवडक २० घरांतील सजावटपूर्ण गणपतीच्या मूर्तीमधून तीन मूर्ती निवडून त्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा, असे मंडळाचे वरूण दप्तरी, पवन राठी, अक्षय बेदमोहता, सौरभ सराफ व बारभाई गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
११७ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारे सेलूचे बारभाई गणेश मंडळ
By admin | Published: September 05, 2016 12:39 AM